घोरपडीतील बी.टी. कवडे रोड परिसरात विजेचा लपंडाव 

वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक मेटाकुटीला 
 
s
महावितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष तर राजकीय नेत्यांचा कानाडोळा 

घोरपडी - पुण्यातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोरपडीतील बी. टी. कवडे रोड परिसरात गेल्या काही महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता गेलेली वीज सायंकाळी पाच वाजता आली. तब्बल आठ तास वीज पुरवठा खंडित होता. वीज कधी जाईल आणि येईल याचा नेम नसल्याने दैनंदिन व्यवहारावर विपरीत परिणाम झाला आहे. या संदर्भात वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊन देखील त्याचा काडीचाही परिणाम महावितरण अधिकाऱ्यावर होत नाही. 


घोरपडीतील बी. टी. कवडे रोडला पलीकडे वानवडीतून तर अलीकडे राम टेकडी ( हडपसर ) येथून वीज पुरवठा केला जातो. रोडच्या पलीकडे वीज असते तर अलीकडे एक दिवसाआड किमान चार - पाच तास वीज पुरवठा खंडित केला जातो. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी घोरपडीतील महावितरण ऑफिसला फोन केला की, वानवडी ऑफिसला फोन करा म्हणून कर्मचारी सांगतात आणि वानवडी ऑफिसला फोन केला की, राम टेकडी ( हडपसर ) , राम टेकडी ( हडपसर ) ऑफिसला फोन केला की , वानवडीला फोन करायला कर्मचारी सांगतात.  कर्मचारी आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळे होत असल्याने विजेअभावी नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

बी. टी. कवडे रोड परिसरात दळवीनगर , एसएमएम सोसायटी, तारादत्त कॉलनी,, सोलर्स पार्क, वटारे मळा, शिर्के कंपनी, सिताडेल सोसायटी आदी भागातील नागरिक वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मेटाकुटीला आले आहेत. नागरिकांच्या तक्रारीकडे जसे महावितरण अधिकाऱ्यांचा कानाडोळा होत आहे, तसे राजकीय नेत्याचे सुद्धा या समस्याकडे लक्ष नाही. बी. ती. कवडे रोडवर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली कार्यालये थाटली आहेत, अनेकांना नरगसेवक पदाचे स्वप्न पडत आहे, परंतु एकही नेता या समस्येबाबत आवाज उठवत नाही. 


वीज गेल्यानंतर घरातील सर्व उपकरणे बंद पडत असून, वर्क फॉर्म होम काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना तर आपले काम बंद ठेवून वीज केव्हा येईल याची वाट पहावी लागते. तसेच विजे अभावी पाणी पुरवठयावर मोठा परिणाम होत आहे. अनेक वेळा सकाळी आठ वाजताच वीज गुल होते. त्यामुळे लोकांना थंड पाण्याने अंघोळ करून ऑफिसला जावे लागते. महिलांना वीज गायब झाल्यानंतर मिक्सर ऐवजी खलबत्ता घेऊन शेंगदाणे , चटणी कुटावी लागते, यावेळी महिला महावितरण अधिकाऱ्यांचा उद्धार करीत आहेत. तसेच दुकानदार देखील महावितरण अधिकाऱ्यांच्या नावे बोटे मोडत आहेत. वीज अचानक गेल्याने टॉवरमध्ये राहणाऱ्या लोकांना लिफ्टमध्ये अडकून पडावे लागत आहे. 

चार नोव्हेंबर चार तास, ६ नोव्हेंबर रोजी तीन तास, ८ नोव्हेंबर रोजी सहा तास तर आज ११ नोव्हेंबर रोजी तब्बल आठ तास वीज पुरवठा खंडित होता. अधिकारी दररोज वेगवेगळी कारणे सांगत आहेत. आज केबल फॉल्ट झाल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्यात देखील दररोज किमान तीन तास वीज गुल होत होती, तेव्हा फिडरमध्ये पाणी गेल्याचे सांगण्यात येत होते. आता केबल फॉल्टचे कारण सांगितले जाते. अधिकाऱ्यांकडे कारणे आहेत तर राजकीय नेत्यांना या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने आपण खेडेगावात राहत असल्याचा समज अनेकांना झाला आहे. 


 

From Around the web