श्री पंचकेदार मंदिरात' यंदाच्या गणेशोत्सवात विराजमान होणार 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न
 
dagduseth

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे १३० व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात येणार आहे. कोविड महामारीमुळे सलग दोन वर्षे गणेशोत्सवात मुख्य मंदिरातच श्रीं ची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. मात्र, यावर्षी उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना पुन्हा एकदा याजागी श्रीं चे दर्शन घेता येणार आहे. यंदाची सजावट असलेले श्री पंचकेदार मंदिर उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित असलेल्या आणि अत्यंत पवित्र असलेल्या भगवान शिवाच्या पंचकेदार मंदिराची तेजस्वी प्रतिकृती आहे. त्यामुळे गणेशोत्सवात दगडूशेठ ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे.
 
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा शिल्पकार विवेक खटावकर व वैशाली खटावकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, मुरलीधर लोंढे, हेमंत रासने, विजयकुमार वांबुरे, उत्तम गावडे, अक्षय गोडसे, अमोल केदारी, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, बाळासाहेब रायकर, नितीन राऊत यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. प्रत्यक्ष शिवाचा निवास असलेल्या पाच शिव मंदिरांचा हा समूह पंचकेदार मंदिर या नावाने प्रसिध्द आहे. ही पाच शिव मंदिरे उत्तराखंड मधील गढ़वाल येथे स्थित असून शिवशंकराच्या केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि काल्पेश्वर या नावांनी प्रसिद्ध आहेत. पंचकेदार मंदिर म्हणजे पाच सुवर्णी शिखरांचे असून हिमालयातील मंदिर स्थापत्याची प्रतिकृती असेल.
 
भगवान शिवाच्या पंचमुखी रुपाची प्रतिष्ठापना या मंदिराच्या ललाट बिम्बावर असून, हिमालयातील मंदिरशिल्प समूहाची ही कलात्मक पुर्नरचना असणार आहे. गंगा, यमुनोत्री, भागीरथी किंवा गंगा तसेच शिवाच्या अष्टमूर्तींचे प्रतिक असलेले गर्भगृह आणि प्रत्यक्ष शिवाचे वाहन नंदीच्या शिल्पाने आणि अनेक देवता, शिवगणांच्या, सुरसुन्दरींच्या तसेच पशु-पक्ष्यांच्या, लता-वेलींच्या मूर्तीरुप उपस्थितीने श्रीगणरायाचे यंदाचे श्रीपंचकेदार मंदिर, म्हणजे प्रत्यक्ष शिवलोक असेल. श्रीपंचकेदारमंदिर म्हणजे तीर्थ स्थळातील प्रमुख असलेल्या चारधाम यात्रेचे एक प्रमुख मंदिर असून त्या मंदिरसमूहाचे दुर्लभ दर्शन गणेशोत्सवात घडेल.

केदार हे नाव प्रत्यक्ष शंकराचे असून केदारनाथाचे मंदिर देशातील १२ ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक आहे. हे शिव स्थान हिंदू धर्मातील तीर्थस्थळांत छोटा चारधाम या नावाने देखील महत्वाचे आहे. हिमालयातील इथल्या पाच शिवमंदिरांचे क्षेत्र केदारक्षेत्र किंवा केदारखंड या नावाने देखील ओळखले जाते. अशा या देवाधीदेव महादेवाच्या पाच मंदिर समूहांचा म्हणजे श्री पंचकेदार मंदिराची अत्यंत मनोहारी प्रतिकृती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी यावर्षी गणेशउत्सवात समर्पित करण्यात येत आहे.

श्री पंचकेदार मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १०० फूट लांब, ५० फूट रंद आणि ८१ फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. सजावट विभागात ४० कारागिर दिवस-रात्र कार्यरत राहणार असून त्यानंतर राजस्थानमधील कारागिर रंगकाम करणार आहेत. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येणार असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने दर्शन घेणे शक्य होणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.
 

From Around the web