पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पगडी सज्ज

पुणे :' विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद-भ्रम अमंगळ ' संत तुकारामांच्या अभंगातील या ओळींचा समावेश असलेली आगळीवेगळी पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे.
पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांनी ही पगडी केली आहे. देहू संस्थानने हे काम मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे सोपवले होते.पुणे मेट्रो उद्घाटनानंतर पुणे पालिकेतील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमातदेखील मोदी यांच्यासाठी तत्कालिन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आगळी वेगळी पगडी मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून तयार करून घेतली होती.गिरीश मुरुडकर यांनी मुरुडकर झेंडेवाले यांच्या चार पिढयांची परंपरा असलेल्या कलेची माहिती दिली.
चौथ्या पिढीची परंपरा :बारशापासून निवडणुकीपर्यंत उपयोगी पडणारी कला
पुण्याच्या इलेक्ट्रॉनिक मार्केट मध्ये पासोड्या विठोबा परिसरात असलेले मुरुडकर झेंडेवाले यांचे दुकान सार्वजनिक कामात वावरणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे.गिरीश मुरुडकर इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमाधारक असून,देश-विदेशात करियरच्या संधी असून,इलेक्ट्रॉनिक मार्केट मध्ये दुकानाची जागा असून देखील घरच्या पारंपरिक व्यवसायात रमले.आता हा व्यवसाय चौथ्या पिढीकडे जाईल.मुरुडकरांच्या चार पिढ्या या कला व्यवसायात रमल्या आहेत. बारशापासून,गणेशोत्सव,सभा-संमेलने,मोर्चे,आंदोलने,निवडणूक अशासाठी बारा महिने मुरुडकर झेंडेवाले कलात्मक गोष्टी घेऊन उपलब्ध असतात.
राजीव गांधी,अटलजी,सचिन तेंडुलकर,अमिताभ बच्चन यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मान्यवरांकरीता फेटा,पगडी करण्याचा बहुमान मुरुडकर झेंडेवाले यांना मिळाला आहे.
गणेशोत्सव,धार्मिक उत्सवासाठी येथील कलावस्तू अगदी परदेशात देखील जातात,असे गिरीश मुरुडकर यांनी सांगितले.
इतिहासात देशाचे पंतप्रधान प्रथमच देहूत
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या (14 जून) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पुणे जिल्ह्यातील देहू (PM Narendra Modi Visit To Dehu) येथे येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजधानी मुंबई आणि पुणे शहरासह राज्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच, मुंबई -पुण्यामध्ये बाहेरुन दाखल होणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. देहू (Dehu) संस्थानाकडून मार्च महिन्यात मिळालेल्या निमंत्रणाचा स्वीकार करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. देहू येथे पंतप्रधान संत तुकारामांच्या मूर्ती आणि शिळा मंदिराचं लोकार्पण करतील.
इतिहासात देशाचे पंतप्रधान प्रथमच काही निमितताने देहू येथे येत आहेत. उल्लेखनीय असे की संत तुकारामांच्या मूर्ती आणि शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असले तरी, या मंदिराची पायाभारणी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केली होती. आता बांधकाम पूर्ण झाले असून मंदिर लोकार्पणासाठी खुले होत आहे. त्यासाठी 14 जून हा मुहूर्त काढला आहे.