कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय 

पिंपरी-चिंचवडमध्ये अश्विनीताई जगताप आघाडीवर
 
ss

पुणे  – भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला व ब्राम्हण समाजबहुल मतदारसंघ असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे कमळ यावेळेस या मतदारसंघातील परंपरागत मतदारांनी कुस्कारून फेकले आहे. तब्बल २८ वर्षानंतर हा ऐतिहासिक विजय काँग्रेसला प्राप्त करता आला. धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला असून, धंगेकर यांना ७३ हजार १९४ तर रासने यांना ६२ हजार २४४ इतके मते पडली. 

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत २० फेर्‍यांत मतमोजणी पार पडली. प्रत्येक फेरीत धंगेकर हेच आघाडीवर राहिले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील भाजप उमेदवाराच्या विजयासाठी सभा घेतली होती. तरीही मतदारांनी भाजपला पराभवाची धूळ चारली. दरम्यान, भाजपचे आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या जागेवर जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप याच आघाडीवर असून, त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 

या मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) या पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन अश्विनी जगताप यांच्या पथ्यावर पडले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या संभाव्य पराभवालादेखील कलाटे यांचीच बंडखोरी कारणीभूत ठरणार आहे. हे वृत्तलिहिपर्यंत ५९ हजार मते घेऊन श्रीमती जगताप या आघाडीवर आहेत.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ५०.०६ टक्के मतदान झाले होते. म्हणजेच, २ लाख ७५ हजार ६७९ मतदारांपैकी १लाख ३८ हजार ०१८ मतदारांनी मतदान केले होते. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. धंगेकरांनी भाजपच्या रासनेंसमोर तगडे आव्हान उभे केले होते. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले होते. मतमोजणीपूर्वीपासूनच राजकीय वर्तुळात भाजपच्या हातून पारंपारिक मतदारसंघ काँग्रेस हिसकावून घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. ही पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. भाजपने टिळक वाड्याला नाकारून नवीन उमेदवार मैदानात उतरला. त्यामुळे सुरवातीपासून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. अखेर ही नाराजी भाजपला महागात पडली. एवढेच नाहीतर गिरीश बापट यांनीही नाराजी दर्शवत प्रचारापासून दूर राहिले होते.


भाजपमधील अंतर्गत नाराजी अखेरीस रवींद्र धंगेकर यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे त्यांनी तब्बल ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. धंगेकर यांच्या बाजूने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता. आदित्य ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनीही प्रचार केला होता. महाविकास आघाडीने एकीचे बळ दाखवून पूर्ण ताकदीने प्रचार केला. अखेरीस महाविकास आघाडीची मेहनत कामी आली आहे.


‘आजचा विजय हा जनतेचा आणि महाविकास आघाडीचा आहे, अशी पहिली प्रतिक्रिया मविआचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.

मी उमेदवार म्हणून कमी पडलो. हा निकाल मला मान्य आहे. तसेच पक्षाने मला संधी दिली पण मी कमी पडलो माझा पराभव मला मान्य अशी प्रतिक्रिया कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे. कसब्यात गेल्या काही दिवसांपासून हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर यांच्यात काटे की टक्कर सुरु होती. ती काटे की टक्कर शेवटपर्यंत पाहायला मिळाली.

From Around the web