रोटी तलाव ओव्हरफ्लो : आमदार राहुल कुल यांच्या हस्ते जलपूजन

दौंड - दौंड तालुक्यातील रोटी तलाव ओव्हरफ्लो झाला असून, वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावाच्या पोटचारीतून ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाणी पोहोचले.आमदार राहुल कुल यांच्या हस्ते तलावस्थळी जलपूजन करण्यात आले. जनाई शिरसाई उपसा सिंचन योजने अंतर्गत दौंड तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या रोटी गावच्या तलावात पाणी पोहोचले. यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून १ किलोमीटर लांबीच्या या पोटचारीच्या दुरुस्तीसाठी काम हाती घेण्यात आले. ३ ते ४ महिन्यांच्या कालावधीनंतर हे काम पूर्ण झाले. रोटी तलावात पाणी पोहोचले आणि गावकऱ्यांनी मोठा जल्लोष केला.
रोटी हे जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील तालुक्यातील शेवटचे गाव. या ठिकाणी पाणी पोहोचविण्यास अनेक अडचणीं येत होत्या, परंतु रोटी गावातील तरुणांनी श्रमदान व लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी करून गावाचा कायम दुष्काळी शिक्का पुसण्याचा निर्धार केला. हिंगणी गाडा शाखा अंतर्गत सुमारे ९ किमी लांबीच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम करुन जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी रोटी येथे आणण्यात यश आले.
याकामी पाटबंधारे विभागाशी पाठपुरावा समन्वय करून आवश्यक यंञणा व तांत्रिक सहकार्य आपण उपलब्ध करून दिले . सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले याचा मला मनस्वी आनंद होत असल्याचे कुल यांनी सांगितले. प्रसंगी याकामी कष्ट घेणाऱ्या सर्व तरुण सहकारी, ग्रामस्थ, व पाटबंधारे विभागाचे कुल यांनी अभिनंदन केले. प्रथमच येणाऱ्या पाण्याच्या स्वागतासाठी गावकरी चातकाप्रमाणे वाट पाहत असल्याचे सदृश्य चित्र पाहावयास मिळाले.