बोगस डॉक्टर्स आणि कोरोना : भय इथले संपत नाही

 
बोगस डॉक्टर्स आणि कोरोना : भय इथले संपत नाही

आज घडीला राज्यात 34 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद, तर एकाच दिवसात 960 रुग्णांचा मृत्यू....अशा बातम्या झळकतात तेव्हा कोल्हापुरात काय सुरू आहे याचा विचार होतो.
1 जानेवारी 2021 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. कालपर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 274 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 460 झाली आहे.
कोल्हापुरातील कोरोना बळींच्या एकूण आकड्याकडे लक्ष दिले तर लक्षात येईल की, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. 

  • कोल्हापूर ग्रामीण - 1412
  • कोल्हापूर नगरपालिका- 466
  • कोल्हापूर महापालिका- 613
  • इतर जिल्ह्यातील रुग्ण - 349
  • एकूण मृत्यू -2840.( हे आकडे गेल्या आठवड्यापर्यंतचे आहेत.)

कोरोनाची दुसरी लाट सध्या देशभर उसळली आहे. आपल्या राज्यातही स्थिती गंभीर आहे. पहिल्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शहरी भागात जास्त होती. मुंबई-पुणेसारख्या शहरात दहशत पसरवली होती. राज्यातील इतरही शहरे याला अपवाद नव्हती. परंतु आता दुसऱ्या लाटेत ग्रामीण भाग ग्रस्त झालाय. मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून रुग्ण सापडत असून मृत्यूचे प्रमाणही चिंता वाढवणारे आहे. 
अलिकडेच टास्कफोर्सच्या टीमने कोल्हापूरचा दौरा केला. कोल्हापूरात मृत्यूचे प्रमाण अधिक का वाढले याचा शोध घेण्यासाठी हा दौरा होता. 

टास्कफोर्सच्या म्हणण्यानुसार कोल्हापूरात मृत्यू दर वाढीची तीन कारणे

१. कोरोना बाधित रुग्ण लवकर उपचार सुरू करीत नाहीत. घरीच उपचार करतात आणि त्रास वाढल्यानंतर रुग्णालयाकडे येतात. यात वेळ जातो आणि मृत्यू होतो.

२. कोल्हापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा बेफिकीरपणा कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग गावागावात झपाट्याने पसरु लागला आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील कोव्हिड सेंटर कमी पडत आहेत. तसेच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन या सुविधाही कमी पडत आहे. त्यामुळेही मृत्यूदरात वाढ होत आहे.

३. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालय सध्या हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू होत आहे, असे कारण टास्कफोर्सने दिले आहे.

थोडक्यात ग्रामीण भागातले मृत्यूचे प्रमाण वाढले आहे कारण इथे आरोग्य सेवा तोकडी आहे. पूर्ण तालुक्यात बोटावर मोजता येतील इतकेच अधिकृत पदवी असलेले डॉक्टर्स प्रॅक्टीस करतात. बाकी ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. कधी काळी रुग्णालयात कंपाऊंडर म्हणून काम केलेल्या लोकांनी ग्रामीण भागात उघडपणे दवाखाने उघडले आहेत. त्यांच्याकडे होणारा उपचार कसा असतो याचे वर्णन न केलेलेच बरे. विशेष म्हणजे हे डॉक्टर्स बोगस आहेत हे माहिती असूनही आरोग्य यंत्रणा काहीही कारवाई करीत नाही. एकूणच कोविडसह इतर रुग्णांवर कोण उपचार करू शकतात त्या डॉक्टरांची पात्रता, पदवी यांची यादी आरोग्य विभागाने जाहीर करायला हवी.

कोरोना पसरण्याचे मुख्य केंद्रे आहेत बोगस डॉक्टरांचे दवाखाने

ग्रामीण भागात जर तब्येतीचा त्रास सुरू झाला तर आसपास चांगला कोणता दवाखाना आहे, चांगला डॉक्टर कोण आहे याचा शोध नातेवाईक घेतात. तिथे गेल्यानंतर येणारा अनुभव असा असतो की चांगले पदवीधारक डॉक्टर्स काही कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सक्तीच्या सूचना करतात. आहार, औषधे याबद्दलचा सल्ला देतात. लांबून तपासतात आणि सल्ला देतात. नेमके हेच रुग्णांना आणि नातेवाईकांना आवडत नाही. त्यांना हवे असते इंजेक्शन, सलाईन, हार्ड डोस असलेल्या गोळ्या. मग हे लोक वाट धरतात बोगस डॉक्टरांच्या दवाखान्याची. तिथे त्यांना हे सगळे मिळते. या दवाखान्यांमध्ये गर्दीही भरपूर असते. फिजीकल डिस्टन्सचा फज्जा उडालेला असतो. कोरोनाबाधितांच्या मांडीला मांडी लावून किरकोळ बरं नसलेला बसतो आणि दोन दिवसात कोरोनाबाधित होतो. मग हे सगळे मिळून गाव नासवायला मोकळे होतात. हे खरे दुखणे बरे होत नाही तोवर कोरोनाला आवर आणि मृत्यू दर कमी होणे अशक्य आहे. 

बोगस डॉक्टर्सना मिळतो ग्रामीण भागात लोकाश्रय

ग्रामीण भागात साधारणपणे डोक्यावरुन, पाठीवरुन ओझे वाहण्यामुळे अंगदूखी, पाठदूखीचा त्रास असतो ,चालताना पाय मुरगळणे, शेतात काम करताना जखम होणे, जुलाब होणे, हगवण लागणे, मुलांना जंत होणे, ताप येणे, पोट दुखणे अशा साधारण आजारांचा मुकाबला ग्रामीण भागातले रुग्ण करीत असतात. पण इथे डॉक्टर्सच येत नसल्यामुळे शहरातील दवाखान्यात डॉक्टरच्या हाताखाली इंजेक्शन देण्यासाठी, सलाईन लावण्याासाठी, ड्रेसिंग करण्यासाठी शिकलेले हे लोक स्कूटरवरुन मागे मोठी बॅग अडकवलेले डॉक्टर्स म्हणून या वाड्या वस्त्यांवर, गावा खेड्यात, दूर्गम भागात फिरायला सुरूवात करतात. अल्पावधीतच यांची जाहीरात होते. वर नमूद केलेले गावात होणारे आजार हे थोड्याशा उपचाराने बरे होणार असल्यामुळे या तथाकथित डॉक्टर्सच्या हाताला चांगला गुण असल्याचा लौकिक पसरतो. गावातील सावकार, सरपंच, व्यापारी यांना त्यांच्या हाताच्या गुणाचा प्रत्यय लवकर येतो. मग हळूहळू हा डॉक्टर त्या गावात आपल्या दवाखान्याचा बोर्ड लावतो आणि उद्घाटनाला सरपंच, पाटील, सदस्य, चेअरमन इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून हजर असतात. आपल्या गावात डॉक्टर आणल्याचा आणि गावाचा विकास होत असल्याचा भाव सगळ्यांच्या  चेहऱ्यावर असतो.

बोगस डॉक्टर्स करताहेत कोरोनावरही उपचार!!

आपण बोगस डॉक्टर्स किंवा ज्यांना रुग्णांवर उपचार करण्याची आरोग्य विभागाकडून परवानगी नाही असे लोक कसे बरं डॉक्टर म्हणून मिरवतात? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. त्याचे उत्तर दडलंय आपल्या ठिसूळ आरोग्य व्यवस्थेत. आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. इथं प्रशिक्षित डॉक्टर्सचा वावर असतो. पण क्वचितच उपकेंद्रात नियमितपणे डॉक्टर्स हजर असतात. निवासी डॉक्टर्सचा तर उपकेंद्रातही कधीच पत्ता नसतो. त्यामुळे दिवसभर शेता-रानात राबणारे गावकरी संध्याकाळी गावात येणाऱ्या डॉक्टर्सवर अवलंबून असतात. शहराच्या जवळच्या गावांचा विचार केला तर इथे पदवीधर डॉक्टर्स प्रॅक्टीस करण्यासाठी प्राधान्य देतात.(दुर्दैवाने शहरालगतच्या गावात निम्मे डॉक्टर्स बोगस असल्याचे सध्या चित्र आहे.) मात्र दूरवर, छोट्या गावात, वाड्यांवर किंवा दूर्गम भागातील गावात प्रशिक्षित पदवीधर डॉक्टर्सचाही पत्ता नसतो. नेमका याच गोष्टीचा लाभ या बोगस डॉक्टर्सना होतो. अशा गावांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये साधं किराना मालाचं दुकान असणे दुर्लभ तिथे औषधाचे दुकान हा विचारही मनाला शिवत नाही. मग हे उपचार करणारे डॉक्टरसाहेब सोबत औषधेही घेऊन फिरत असतात. यांच्या फार्मसीमध्ये इंजेक्शन ते सलाईन आणि जगातील सर्व आजारावरची औषधे असतात. सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या काळात हेच बेगडी डॉक्टर्स कोरोनावरही उपचार करीत आहेत हे दुर्दैवाने सत्य आहे.

आरोग्य निरक्षरता संकटाच्या मूळाशी

आपल्याकडे आरोग्य आणि विज्ञान विषयक जागरुकतेचा अभाव ग्रामीण भागासोबत शहरातही आहे. साधं अंग दुखलं, ताप आला तर इंजेक्शन न टोचणारा, सलाईन न लावणारा डॉक्टर बरा नाही हा समज सर्वत्र आहे. जेव्हा अंगातला ताप किंवा कणकण साध्या पॅरासीटमॉलच्या गोळीने बरा होत असेल तर मग इंजेक्शन का? असा प्रश्न लोक विचारत नाहीत किंवा तोंडावाटे औषधं, अन्न घेणाऱ्या व्यक्तीला सलाईनची गरज असते का? याबद्दल जागरुकता नसते तेव्हा दोष जितका देणाऱ्याचा आहे तितकाच घेणाऱ्यांचाही आहे. आपल्या अभ्यासक्रमात प्रथोमोपचाराचा विषय आहे किंवा नाही हे मला माहिती नाही परंतु तो फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर प्रत्येक नागरिकाला शिकवून किमान आरोग्य साक्षर करायला हवे. याबाबतची निरक्षरताच आजच्या घाताला एक कारण आहे.
बऱ्याच वेळेला पेशंटंच डॉक्टरना एक इंजेक्शन द्या, सलाईन लावा अशी मागणी करतात. जे खरे डॉक्टर्स आहेत ते असे कधीच पेशंटचे ऐकणार नाहीत. कारण इंजेक्शन आणि सलाईन केव्हा द्यायचं हे त्यांना माहिती आहे. किंबहुना त्यांच्यातील सृजनशील डॉक्टर आपल्या पेशाला गालबोट लागेल असे वागत नाही. याउलट हे बोगस डॉक्टर्स असतात. पेशंटच्या इच्छेनुसार ते उपचार करतात आणि उखळ पांढरे करतात. 
सद्य स्थिती ग्रामीण भागातील लोक हवालदील झालेत. आपल्या सारख्या धडधाकड माणसांना कोरोना कसा होईल असे म्हणणाऱ्यांच्या फोटोवर सध्या चौकात होर्डिंगवर हार चढवण्यात आलाय. त्यामुळे सध्याच्या या कोरोना संकटाच्या काळात आपली माणसं जीवंत राहावीत यासाठी आपण अनेक उपय योजना करीत आहोत. असंख्य पातळीवर गरजूंना मदत पुरवली जातेय. यासाठी तरुणाई पुढाकार घेत आहे हे नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याबरोबरीनेच आपल्या आरोग्य व्यवस्थेला लागलेला बोगस डॉक्टरांचा व्हायरसही मिटायला हवा.

शहरी डॉक्टर्स आणि बोगस डॉक्टर्स 'भाई भाई'!!

बोगस जरी असले तरी हे भामटे डॉक्टर्स चतुर आहेत. एखादा पेशंट त्याच्या उपचाराच्या कक्षेबाहेर जात असेल तेव्हा ते नातेवाईकांना गंडवतात. उत्तम उपचारांसाठी ते आपल्या सोयीच्या हॉस्पिटलची शिफारस करतात. रुग्णाची आर्थिक स्थिती काय आहे याचा संपूर्ण सातबारा याच लोकांच्या मार्फत तीथंवर पोहोचतो. शिवाय बील कमी करण्याच्या नाटकातही हे 'बच्चन' अभिनय करतात. यांच्या हाती आजचा आपला गाव, तालुका आणि जिल्हा सुरक्षित नाही हे सांगण्यासाठीचा हा प्रपंच. आपण जागरुक होऊ शकतो का हाही दुसरा प्रश्न?


आपल्या राज्यात पुरेसे डॉक्टर आहेत का?

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 1,000 लोकसंख्येसाठी एक डॉक्टर असणं अपेक्षित आहे. भारतात दर 1,457 जणांसाठी एक डॉक्टर उपलब्ध आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलेल्या गाईडलाइन्स नुसार आहे - 800 रुग्णांसाठी महाराष्ट्रात 1 डॉक्टर उपलब्ध आहे. (अर्थात बोगसांची संख्या अगणीत आहे).  पण यातले अनेक डॉक्टर्स हे मोठ्या शहरांमध्ये एकवटले आहेत. त्यामुळे कोल्हापूरातील पात्र डॉक्टरांची संख्या शोधावी लागेल. पूर्ण राज्यात तुम्हाला एकसारखी आरोग्यसेवा मिळत नाही हे सत्य आहे.

विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्या एवढे असलेले देश आरोग्य क्रांतीत जगभर अव्वल आहे. याचं एकच उदाहरण म्हणजे, अमेरिकेच्या दक्षिणेला वसलेला, बेटांचा समूह असणारा क्युबा हा छोटासा देश- त्याची ना आर्थिक परिस्थिती चांगली ना शेजारी देशांशी असलेले नाते चांगले. असे असतानाही आरोग्याच्या क्षेत्रात जगाने धडे घ्यावेत अशा काही योजना या देशाने यशस्वी केल्या. क्युबात आज प्रत्येक ११९ नागरिकांमागे एक नर्स आणि प्रत्येक १५१ नागरिकांमागे एक डॉक्टर अशी यंत्रणा कार्यरत आहे. डॉक्टर-रुग्ण प्रमाणाच्या क्रमवारीत आज क्युबा हा देश काही सर्वोत्तम प्रमाण असणाऱ्या देशांपैकी एक आहे. 
एकंदरीत वरील सर्व गोष्टींचा विचार करता 'मीडिया' आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासन, सर्व आरोग्य अधिकारी, तहशीलदार, ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार, मंत्री याबद्दल जागरुक होणार नाहीत आणि बोगस डॉक्टरांवर कारवाई करणार नाहीत तोपर्यंत भय इथले संपत नाही.

-राज साळोखे
९१००६९२९००

From Around the web