हेमांगी, यातून कोणती सामाजिक जनजागृती केलीस तू ?

रंगाने काळी सावळी पण बुध्दीने तितकीच हुशार, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून शिकलेली , अभिनयातही चुणूक दाखवणारी एक अभिनेत्री बाई उठते.. खूप छान मेकअप करून, नीट कपडे घालून टीव्ही चॅनेल वर मुलाखत देते..
मुलाखतीचा विषय असतो, बाई , बुब्स आणि ब्रा…
( मुळात कोरोना काळात लोक टेन्शनमध्ये असताना, लॉकडाऊनने त्रस्त झालेले असताना टीव्ही चॅनेलवालेही अक्कल गहाण टाकून असे विषय कसे काय अभ्यासतात, हाही एक वेगळा आणि कळीचा मुद्दा आहे..)
तर, चाणाक्ष वाचकांच्या एव्हाना लक्षात आलं असेल की कोणाबद्दल बोललं जातंय ते..
अहो, अभिनेत्री हेमांगी कवीने बाई, ब्रा आणि स्तन ( म्हणजेच बुब्स बरं का, समस्त महिला वर्गहो ) या विषयावर फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आणि स्त्रियांच्या अत्यंत नाजूक आंगिक विषयाला हात घालून रान पेटवलं…
शब्दांचे असे सटकारे ओढले, without ब्रा आणि मग ब्रा घालून असा डान्स व्हिडिओ पोस्ट केला, की फेसबुक, इंस्टाग्रामवर ती रातोरात चर्चेत आली.. (इतके दिवस, इतके महिने कोणत्या कपड्यावर आणि कोणत्या अवयवाबद्दल लिहावं याची बहुदा ती वाट पाहत होती.. )
सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि शंभरातल्या किमान ९५ जणी तिच्यावर तुटून पडल्या…
हा विषय आताच का मांडावासा वाटला यावर तिने दिलेलं स्पष्टीकरण वाचून, नजरेसमोर प्रत्यक्ष त्या अवतारातली हेमांगी आली..
" मी पोळ्या करताना एक व्हीडिओ पोस्ट केला... त्यावर खूप वेगवेगळ्या कमेंट्स येऊ लागल्या... तुझे बूब्स हलत आहेत.. निप्पल दिसत आहेत.. अगं, तू ब्रा घातली नाहीस का ?" अशा गोष्टी समोर आल्याने एकूणच स्त्री आरोग्य, ब्रा आणि पुरुषी मानसिकतेचा समाचार घेणारी पोस्ट आपण लिहिली असं खुमासदार उत्तर तिने दिलं…
अहो , याला टीव्ही इंडस्ट्रीतून जितका सपोर्ट मिळाला तितकाच राजकीय महिला नेत्यांनीही हेमांगीच्या भूमिकेला पाठिंबा दिला...
बरे, तर आता तुम्हाला सगळा इतिवृत्तांत कळलेला आहे, तर मला काय वाटतं ते मांडते..
तुझ्या घरात तू कपड्यांच्या आत काय घालतेस किंवा नाही हे सांगण्याचा तुझा अट्टाहास आज समस्त स्त्री वर्गाला लाज आणणारा ठरलाय… जिथे आईचं दूध पिताना छोटंसं बाळही डोळे मिटून घेतं, तिथे त्या ममत्व, मातृत्व असणाऱ्या देहाच्या अवयवाची खरतर तू अवहेलना केलेली आहेस…
तू काय केलंस, ब्रा न घालता चपात्या लाटल्यास, तो व्हिडिओ अपलोड केलास आणि मग ट्रोलिंग सुरू झाल्यावर पुन्हा बिन्धास्त ब्रा घालूनही उठावदार दिसणारे सो कॉल्ड बुब्स लोकांना व्हायरल व्हिडिओतून दाखवलेस…
यातून कोणती सामाजिक जनजागृती तू साध्य केलीस ?
की अभिनय क्षेत्रात काम मिळत नाही म्हणून बॉडी एक्सपोज करून आपली फिगर दाखवण्यासाठी खटाटोप केलास ?
वर काय तर , माझ्या घरातल्या पुरुषांची मानसिकता ही अशी आहे, तशी आहे हे सांगून तुझ्या घरातल्या पुरुषांना तर तू मर्यादा पुरुषोत्तमच ठरवलंस…
म्हणजे तुझ्या घरातील पुरुष वगळता, समाजातील बाकीचे पुरुष निर्लज्ज, मांसाच्या गोळ्यांकडे आडून आडून पाहणारे अशीच तुझी धारणा झालेली दिसतेय, बहुदा..
तुझ्या घरातले तुझ्या बुब्सना पाहत नसतील, त्यामध्ये इंटरेस्ट घेत नसतील.. याचा अर्थ हा नव्हे की ते दुसऱ्या बाईच्या बुब्सकडे पाहत नसतील..
बरे , एवढा सगळा पसारा तू मांडलास, मुलाखती द्यायला पुढे आलीस.. तेव्हा का नाही तुझे बुब्स दाखवलेस ?
डान्स व्हिडिओमध्ये तर बिन्धास्त ब्रा घालून थिरकत होतीस, मग मराठी चॅनेलवर इंटरव्ह्यू देतानाही without ब्रा बसली असतीस, तुझे निप्पल दिसले तर तुझं खरं कौतुक वाटलं असतं..
अगं, मुळात चॅनेलवाल्यांना फक्त चर्चा करण्यातच इंटरेस्ट होता का ? तुझे without ब्रा निप्पल पाहण्यात बहुदा चॅनेलवाल्यांना वेळ आणि इंटरेस्ट नसावा... लक्ष असतं माझं म्हणत साम टीव्ही, बीबीसी मराठी यांनी कुठे आणि कसे लक्ष दिलं ते न कळायला प्रेक्षक दूधखुळे नाहीत..
बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे मला झाकायला आवडत नाहीत असे तू म्हणतेस.. पण किती उशिरा..
जेव्हा काही काम नाही तेव्हा पब्लिसिटी मिळवायचा हा मस्त प्रकार तू केलास...
हेमांगी म्हणते, लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो...
अगं हेमांगी, आता तू किती वेळा ब्रा घातली आणि घातली नाहीस यावरही टीव्ही वर चर्चासत्र झालं तर नवल वाटणार नाही.. नाही का ?
ब्रा घाऊन डान्स व्हिडिओ करण्याऐवजी स्तनाग्रे असणारे बुब्स दाखवायला हवे होतेस, अशा कमेंट्सचा पाऊसही लवकरच पडेल किंवा कळत-नकळत पडलाही असेल..
मुळात पोळ्या करताना तुला हे नक्की माहित होते की काय दाखवायचं आहे ते.. त्यावरून पुढे काय घडणार हेही तुला नीट माहीत होते..
पण एक लक्षात ठेव, जर खुलेआम लिहिण्याची, बोलण्याची हिम्मत करतेस ना, तशी खुलेआम वावरण्याचीही हिम्मत बाळग..
बघू कोण तुझ्या केसाला (... ला) धक्का लावत ते…
पण भविष्यात एक स्त्री म्हणून आपण भूतकाळात कोणत्या गोष्टीचं अवडंबर माजवलं आणि मग कशा फेमस झालो याचे गोडवे पुढच्या पिढीपुढे तू नक्कीच मांडू शकणार नाहीस… हेही तितकंच खरं…
- प्रचिती, मुंबई