पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू 

 
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू
मृत्युमुखी पडलेले पाचही जण मजुर म्हणून काम करत होते. दोन पुण्यातील, दोन उत्तर प्रदेशमधील आणि एक बिहारचा आहे.  1.महेंद्र इंगळे , 2. प्रतिक पाष्टे , 3.बिपीन सरोज , 4.सुशीलकुमार पांडे , 5. रमाशंकर हरिजन अशी त्यांची नावे आहेत. 

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेले  बांधकाम मजूर असण्याची शक्यता आहे. आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचं सांगण्यात आलं. 

“सुरुवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग १०० टक्के विझल्यानंतर आपली लोकं शेवटच्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मजला खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह पडले होते. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला,” असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.


मृत्युमुखी पडलेले पाचही जण मजुर म्हणून काम करत होते. दोन पुण्यातील, दोन उत्तर प्रदेशमधील आणि एक बिहारचा आहे.  1.महेंद्र इंगळे , 2. प्रतिक पाष्टे , 3.बिपीन सरोज , 4.सुशीलकुमार पांडे , 5. रमाशंकर हरिजन अशी त्यांची नावे आहेत. 

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात आली आहे. आग आटोक्यात यायला 2 ते 3 तास वेळ लागला. आता आग आटोक्यात आली आहे. या आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.


राजेश टोपेंनी सांगितलं की, कोरोना लस निर्मिती जिथं होते ती इमारत घटनास्थळापासून दूर आहे. त्यामुळं लसीला कुठलंही नुकसान नाही. यासंदर्भात पोलिस तपास सुरु आहे, असं टोपेंनी सांगितलं.


सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.

दरम्यान याप्रकरणी पोलीस चौकशी करत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. पोलीस तपासासोबत फायर ऑडिटही केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान , मुख्यमंत्री उद्वव ठाकरे सीरम इन्स्टिट्यूटला उद्या भेट देणार आहेत. 

From Around the web