राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी

 
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी

पुणे  - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयंत रामचंद्र पाटील ( रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली ) असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे स्पष्ट झाले असून ही धमकी देण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे कार्यालय असून याठिकाणी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सदर व्यक्तीने फोन करत चाकणकर यांचे धायरी येथील कार्यालय पेटवून देतो अशी धमकी दिली. यावेळी रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सदर घडलेला प्रकार चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी चाकणकर यांना सांगितले. त्यानंतर चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


पोलीस योग्य ती कारवाई करतील: चाकणकर

कोणत्याही प्रकारचे राजकीय वैमनस्य नसताना अशाप्रकारे अर्वाच्य भाषा वापरणारा आणि कार्यालय पेटून देतो असे बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया यावर रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

From Around the web