पुण्यात राष्ट्रवादी नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल 

 
s

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात खळबळ उडाली आहे.  समीर बंडुतात्या गायकवाड (रा. मुंढवा ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. 

 फिर्यादी महिला या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. समीर गायकवाड याचे भाजी घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. सुमारे दीड वर्षापूर्वी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या घरात एकट्या असताना आरोपी घरी आला. किचनमध्ये त्याने फिर्यादी यांच्या कंबरेस पकडले. त्यांनी विरोध केल्यावर तुझ्या नवऱ्याला व मुलांना जीवे मारण्याची, तुमचे खानदान संपवून टाकीन, अशी धमकी दिली. या धमकीमुळे तिने कोणाला हा प्रकार सांगितला नव्हता. त्यानंतर १७ डिसेबर २०२१ रोजी दुपारी २ वाजता समीर गायकवाड हा फिर्यादी यांच्याशी पुन्हा जबरदस्तीने शरीरसंबंध करीत होता. त्यावेळी फिर्यादीचे पती व मुलाने हा प्रकार पाहिला. तेव्हा त्याने त्यांना मारण्याची धमकी देऊन निघून गेला. या प्रकारानंतर आता त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर गायकवाड याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, नगरसेवक सुनिल ऊर्फ बंडु जयवंतराव गायकवाड यांनी आपल्याकडून जबरदस्तीने खंडणी मागितल्याचा आरोप करीत मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, आपला मुलगा समीर हा १७ डिसेबर २०२१ रोजी भाजी खरेदी करण्यासाठी गेला असता विवाहितेच्या पतीने त्यास घरात बोलावून चहा दिला व तो बाहेर गेला. तेव्हा समीर हा त्याच्या पत्नीशी बोलत असताना त्याने तिचा विनयभंग केला असे खोटे भासवून समीर याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार देण्याची भिती दाखवून व त्यांच्या प्रतिष्ठेस बाधा आणण्याची भिती दाखवली. ही विवाहिता, तिचा पती, मुलगा व त्यांची आई, भाऊ यांनी आपल्याला जबरदस्तीने ३ लाख रुपये देण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 
 

From Around the web