Pune Crime News : मारहाणीत दुचाकीस्वाराचा मृत्यू; कट मारल्याच्या कारणातून वाद

पुणे - चारचाकी गाडीला दुचाकीचा कट लागल्याने झालेल्या वादातून दुचाकीस्वाराला मारहाण करण्यात आली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अक्षय अंकुश टिळेकर (वय 23, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) असे मृताचे नाव आहे.
चारचाकी गाडीतील तिघांनी अक्षय याला मारहाण केली होती. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास उरुळी कांचन परिसरात घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अक्षय टिळेकर हा दुचाकीवरून निघाला होता.
यावेळी त्याचा कारला धक्का लागला. त्यानंतर कारमधील नागरिकांनी त्याच्याशी वाद घालत बेदम मारहाण केली. यात अक्षय बेशुद्ध पडला. पोलिसांनी अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर अक्षय याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.