कात्रजमध्ये लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

पुणे - लक्ष्मीपुजनासाठी ठेवलेली साडेतीन लाखाची रोकड आणि दोन तोळे सोन्याचे दागिने असा 4 लाख 10 हजाराचा ऐवज चोरण्यात आला. ही घटना कात्रज-मांगडेवाडी येथील जगन्नाथतिर्थ अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी विजय गोळे(46) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विजय गोळे हे सेफ्टी डोअरला बाहेरुन कडी लावून गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन लक्ष्मीपुजनासाठी हॉलमध्ये ठेवलेली साडेती लाखाची रोकड आणी सोन्याचे दागिने चोरुन नेले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी भेट दिली. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे करत आहेत.
तर सहकारनगर येथे प्रमोद बुटे (63,रा.ज्योती सोसायटी , सहकारनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार त्यांच्या घरातील 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. बुटे यांनी लक्ष्मीपुजनासाठी देवघरात पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि 26 हजार 500 रुपयांची रोकड ठेवली होती. लक्ष्मीपुजनझाल्यावर ते वरच्या मजल्यावर असलेल्या बेडरुममध्ये झोपायला गेले होते. सकाळी उठल्यावर त्यांना ऐवज देवघरात नसल्याचे दिसले. त्यांचे घराला जुन्या लोखंडी बारची खिडकी आहे. त्यातील गॅपमधून चोराने घरात प्रवेश केल्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे करत आहेत.
चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात प्रकाश वाटवे (76,रा.लेण्याद्री हौसिंग सोसायटी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या घरात लक्ष्मी पुजन ते पाडव्याच्या दरम्यान चोरटे खिडकीचा गज तोडून आत घुसले. त्यांनी 30 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने, चांदीचा छल्ला, रोख 700 रुपये आणि दोन मोबाईल असा 45 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उकिर्डे करत आहेत.