अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत महाराष्ट्रामुळेच जिवंत – पं. अजॉय चक्रबर्ती

 
s

पुणे  : पूर्वी शास्त्रीय संगीताचे चाहते व जाणकार  हे केवळ बंगालमध्येच राहिले आहेत असे म्हटले जायचे, मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संगीत, राग यांचा विचार होतो आणि म्हणूनच अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत हे महाराष्ट्रामुळेच जिवंत आहे, असे गौरवोद्गार पद्मभूषण पं. अजॉय चक्रबर्ती यांनी काढले.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या व्यासपीठावरून आपली कला सादर करण्यापूर्वी पं. चक्रबर्ती यांनी शुक्रवारी उपस्थितांशी संवाद साधला.

ते म्हणाले, "पुण्यामध्ये देशविदेशातील कलाकार येऊन आपली कला सादर करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रसिक संगीतावर भरभरून प्रेम करतात. नागरिकांमध्ये शास्त्रीय संगीताबद्दल आदर व प्रेम आहे. त्यामुळेच आज शास्त्रीय संगीत जिवंत असून, ते योग्य प्रकारे व श्रद्धेने नव्या पिढीपर्यंत नेण्याची गरज आहे. यासाठी मी देखील प्रयत्नशील असून, गेली २० वर्षे मी मुंबईमध्ये यासंदर्भात संशोधन करत आहे.’’

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा भारतीय कलाकारांसाठी जणू तीर्थक्षेत्र आहे असे सांगत ते पुढे म्हणाले, "मी संगीताचा एक सामान्य दास आहे, असेच मानतो. या महोत्सवात गाणे सादर करणे हे माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट असते. तुम्ही ज्याप्रकारे माझ्या मुलीला व शिष्यांना आशीर्वाद दिला त्यासाठी मी नेहमीच कृतज्ञ असेल. हा महोत्सव केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम नाही तर संगीताचे शिक्षण देखील यामधून मिळते. नव्या पिढीला ' सा'  हा स्वर जरी समजला तरी मानवता समजली असे मी मानतो. संगीतातून 'व्हिजन' निर्माण करता येऊ शकते. विज्ञान, तंत्रज्ञान अशा विविध विषयांमध्ये या माध्यमातून प्रगती करता येऊ शकते आणि यासाठी शास्त्रीय आधार देखील आहे. त्यामुळेच या संगीत महोत्सवाची वेळ केवळ रात्री १० वाजेपर्यंत मर्यादित न ठेवता अधिक वेळेची परवानगी मिळावी, यासाठी देश पातळीवरील प्रमुख नेत्यांशी मी चर्चा करणार आहे."

पंडित भीमसेन जोशी हे माझ्या पित्यासमान होते. ते मला नेहमी भरभरून आशीर्वाद देत. इतकेच नव्हे तर कोलकत्याला कार्यक्रमाला आल्यावर मी लावलेल्या तंबोऱ्यावर त्यांचे गायन होत असे, अनेकदा ते मलाही तंबोरा लावून देत. १९८८ साली माझ्या हाताला धरत त्यांनी मला सवाई गंधर्व महोत्सवात गायनाला बसविले हे आजही आठवते आहे. ते कुठेही गेले नाही, तर संगीत रूपाने आजही आपल्यातच आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धातील पहिल्या सत्रात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. माझे वडील आणि आई आज येथे उपस्थित आहेत आणि मी त्यांना गाऊन दाखवत आहे, असे वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी बिहाग रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यानंतर राग मिश्र खमाजमध्ये पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वर प्रदान गायकीचे वैशिष्ट्य खुलवणारी 'सूर संग रंगरलिया...' ही  स्वरचित बंदिश त्यांनी सादर केली. संत कबीर रचना असलेला आणि जोशी यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या 'गुरुविण कौन बतावे बाट' या भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

त्यांना अविनाश दिघे ( हार्मोनियम), पं.रवींद्र यावगल ( तबला), वत्सल कपाळे व मुकुंद बाद्रायणी ( तानपुरा ), गंभीर महाजन (पखावज) आणि माऊली टाकळकर ( टाळ) यांनी साथसंगत केली.  

तिसऱ्या दिवसाचा समारोप पं. चक्रबर्ती यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग बागेश्री' ने त्यांनी गायनाला सुरूवात केली. त्यामध्ये झपतालमधील तराणा, गुलाम अली खाँ यांची रचना सादर करत त्यांनी श्रोत्यांशी शब्द संवाद साधला. पहाडी राग सादर करत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना अजय जोगळेकर ( हार्मोनियम ), ईशान घोष (तबला ), मेहेर परळीकर व सौरभ काडगावकर ( तानपुरा व गायन ) यांनी साथ केली.

From Around the web