MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलताच पुण्यात विद्यार्थ्यांचा संताप 

रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांचा रास्ता रोको 
 
MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलताच पुण्यात विद्यार्थ्यांचा संताप

पुणे - १४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे.

पुण्यातील नवी पेठ येथे संतप्त एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाला सुरुवात केली. शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केलं. विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील दोन्ही रस्ते रोखून धरले होते. पोलिसांकडूनही विद्यार्थ्यांची धरपकड सुरु आहे. परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या सुरु केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी परीक्षार्थींची धरपकड सुरु केली. 

 सुरुवातीला अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला होता. पण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

“इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणं हे चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा. परीक्षेच्या ३ दिवस आधी परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

१४ मार्च रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं परिपत्रक एमपीएससीकडून जारी करण्यात आलं असून त्यामध्ये नव्या तारखा यथावकाश जाहीर केल्या जातील, असं म्हटल्यामुळे नेमक्या परीक्षा पुन्हा कधी होणार? याविषयी देखील विद्यार्थ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली. 

एमपीएससीची परीक्षा ढकलण्याचा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करुन म्हटलं आहे की, “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे.”

From Around the web