उस्मानाबादकरांचे मेडिकल कॉलेजचे स्वप्न साकार होणार !

 
उस्मानाबादकरांचे मेडिकल कॉलेजचे स्वप्न साकार होणार ! उस्मानाबाद –  उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची  उस्मानाबादकरांची मागणी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी तज्ञांच्या समितीने  जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन  उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी केली.
पुणे येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि आ.सुजितसिंह ठाकूर यांच्यासह एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शासकीय महाविद्यालय सुरु करण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान याबाबतची फाईल मागवून घेत केंद्राकडे शिफारस केली.
त्यानंतर उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी, उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी तज्ञांच्या समितीने सोमवारी  जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. या समितीमध्ये डॉ.चंद्रकांत दौडे, डॉ.सुषमा जाधव, डॉ.मंगेश शेलूकर व डॉ.सौ.नन्नवरे मॅडम यांचा समावेश होता. या समितीची भेट घेऊन उपलब्ध सोयी सुविधांबाबत चर्चा केली.
वैद्यकीय संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीषजी महाजन यांच्याकडे तज्ञांची समिती गठीत करुन लवकरात – लवकर अहवाल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे पाठविण्यासाठी पाठपुरावा सुरु होता.समितीला अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली असली तरी 2-3 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना समिती सदस्यांना दिल्या. ऑक्टोबर अखेरपर्यंत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेला अहवाल सादर करणे अभिप्रेत असून पुढील शैक्षणिक वर्षापासून उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यासाठी राणा जगजीतसिंह पाटील यांनी गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करीत आहेत. या पाठपुराव्याला आता यश येत असून  उस्मानाबादकरांचे मेडिकल कॉलेजचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत.

From Around the web