खंडणी प्रकरणी पोलीस मित्र गजाआड

 
खंडणी प्रकरणी पोलीस मित्र गजाआड
खंडणी प्रकरणात पोलीस अधिकारी आणि पत्रकार अडकले

पुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी चोरावर मोर होणाऱ्या एका पोलीस मित्रला पोलिसांनी गजाआड केले आहे. या पोलीस मित्राने बड्या पोलीस अधिकाऱ्यांची ओळख सांगून पाच लाखाची खंडणी उकळली होती.

शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७५ लाख रुपये उकळणाऱ्या आरोपीकडून पोलीस मित्र म्हणून मिरवणारा जयेश कासट ( रा. नारायण पेठ ) याने पाच लाख रुपये खंडणी उकळली होती.

यातील प्रमुख आरोपी मनोज अडसूळ उर्फ अत्रे सध्या फरार असून, न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जो अर्ज केला आहे, त्यात जयेश कासट ( रा. नारायण पेठ ) याने पाच लाख खंडणी उकळल्याचा आरोप केला होता. कासट याने प्रकरण मिटवण्यासाठी काही पोलीस अधिकारी आणि पत्रकाराना पैसे वाटप करणार असल्याचे सांगितले होते, असेही नमूद केले होते.

जयेश कासट हा पोलिसांच्या  विघ्नहर्ता न्यासचा विश्वस्त आहे. त्याने पोलिसांसाठी विविध उपक्रम राबवून बड्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर संबंध प्रस्तापित केले होते. त्याचे अनेक पत्रकाराबरोबरही  सलोख्याचे संबन्ध असून, एक प्रकारची दलाली सुरु होती. या खंडणी प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि पत्रकार गुंतले असून, त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

हे संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचे असून, डॉक्टरांकडून घेण्यात आलेल्या ७५ लाखाच्या खंडणीमध्ये कोणाकोणाचे हात बरबटले आहेत, त्याची चवीने चर्चा सुरु आहे. 

From Around the web