गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

 
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन
गोव्याचे मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आहे.ते ६३ वर्षाचे होते. पर्रिकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. मात्र, आज सकाळपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि काही वेळा पूर्वीच मनोहर पर्रिकर यांची प्राणज्योत मालवली.
१९९४ मध्ये पर्रिकर पहिल्यांदा गोवा विधानसभेवर निवडून गेले. ऑक्टोबर २००० मध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. स्वच्छ प्रतिमा आणि साध्या राहणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पर्रिकर यांनी २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ पासून निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले.
काही महिन्यांपूर्वी मनोहर पर्रिकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. यानंतर ते उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते. उपचार घेऊन भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतली होती. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेले पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते.मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. रविवारी त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. त्यामुळे श्वास घेण्यासही त्यांना अडचण जात होती. शेवटी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंझ अखेर संपली.

From Around the web