'एचपीसीएल'तर्फे राज्य आरोग्य विभागास लस वाहतुकीसाठी वातानुकूलित 'वॅक्सीन व्हॅन'

पुणे : ‘‘राज्य सरकारच्या कोरोना विरोधातील लस टोचणी मोहिमेला गती यावी, नागरिकांना सुरक्षितपणे लवकरात लवकर लस मिळावी, यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (एचपीसीएल) पुढाकार घेतला आहे. कोरोनावरील लशींची वेगाने वाहतूक करता यावी, म्हणून 'एचपीसीएल'तर्फे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला वातानुकूलित 'वॅक्सीन व्हॅन' भेट देण्यात आला. ३२ क्युबिक मीटर क्षमतेच्या या व्हॅनमधून एकावेळी लशींचे ३० लाख डोस घेऊन जाता येतील. राज्यातील हा असा पहिलाच उपक्रम आहे, हे विशेष. ही व्हॅन विशेष करून मराठवाडा आणि विदर्भात लशींचा पुरवठा करेल,’’ अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) पुणे महाप्रबंधक (जनसंपर्क) डॉ. पंकज शर्मा यांनी दिली.
'एचपीसीएल'च्या वतीने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला आरोग्य संचालनालय येथे या वातानुकूलित 'वॅक्सीन व्हॅन'चे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक (परिवहन आरोग्य सेवा) मिलिंद मोरे, राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील, डॉ. सचिन देसाई, युनिसेफ लसीकरण सल्लागार डॉ. सतीश डोईफोडे, 'एचपीएमडीआय'चे प्राचार्य प्रवीण कुमार, 'एचपीसीएल' पुणेचे वरिष्ठ क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक मंगेश डोंगरे, मानव संसाधन विभागाचे सहायक प्रबंधक अंकुर पारे, शीला रवीकुमार आदी उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रवीण कुमार म्हणाले, ‘‘या वातानुकूलित ट्रकची किंमत सुमारे ४० लाख रुपये आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम राबवीत आहे. त्यानुसार अनेक संस्था, संघटना विविध उपक्रम राबवून आपले योगदान देत आहेत. त्यानुसार 'एचपीसीएल'कडून हा वातानुकूलित व्हॅक्सिन व्हॅन राज्य सरकारच्या आरोग्य विभागास भेट देण्यात आले. अजून काही राज्यांना अशी व्हॅन देण्यात येणार आहे. देशाला निरोगी बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’
डॉ. पंकज शर्मा म्हणाले, ‘‘डिसेंबरपासून उपक्रम सुरू आहे. युद्धपातळीवर काम करून या वातानुकूलित ट्रक लस पुरविण्यासाठी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली. नागरिकांना वेगाने लस उपलब्ध होण्यात त्याचा मोलाचा हातभार लागेल. लसीकरणाच्या बाबतीतील गैरसमज बाजूला सारून प्रत्येकाने लस टोचून घ्यायला हवी. त्यातून देश कोरोना संकटातून मुक्त होण्यास मदत होईल. या कामात माध्यमात पुढाकार घ्यावा.’’ मिलिंद मोरे यांनीही मनोगत मांडले. अंकुर पारे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
आरोग्य विभागाकडून 'एचपीसीएल'चे कौतुक
डॉ. दिलीप पाटील म्हणाले, "लसीचे पुरवठादार व लाभार्थी यामधील शीतसाखळी संतुलित ठेवणे महत्वाचे असते. 'एचपीसीएल'च्या या उपक्रमामुळे लशीकरण मोहिमेस बळ मिळेल. 'एचपीसीएल'चे हे सामाजिक दायित्व नक्कीच कौतुकास्पद आहे. समाजाप्रती आपली असलेली जबाबदारी ओळखून 'एचपीसीएल'ने मोलाचे कार्य केले आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांपासून सर्वाना लस दिली जाणार असल्याने, मोठ्या प्रमाणात लसीची वाहतूक करावी लागणार आहे. अशावेळी हे व्हॅक्सिन व्हॅन उपयुक्त ठरेल. कोरोना लसीनंतर भविष्यात इतर प्रकारच्या लसीच्या वाहतुकीलाही याचा लाभ होईल."