सिरमला दणका ! ५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळला ...

पुणे - एकीकडे राज्यासह देशात कोरोनावरील लसीचा तुटवडा जाणवत असताना पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने कोविशिल्ड लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा घाट घातला होता, परंतु सिरमला मोदी सरकारने दणका दिला आहे. ५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला आहे.
आंतरराष्ट्रीय दबाव तसंच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही केंद्र सरकारने सिरमची विनंती फेटाळून लावली आहे. सिरमकडून युकेला लस पुरवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्याआधारे ही विनंती करण्यात आली होती. भारताला सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहिमेलाही जबर धक्का बसला आहे.
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सिरमशी संपर्क साधत लवकरात लवकर लसींचे डोस मिळवण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसींच्या कुप्यांवर असणारे लेबल बदलावे लागणार आहेत. युकेला पुरवठा करण्यासाठी पँकिंग करण्यात आल्याने त्यांच्यावर वेगळे लेबल होते. पण आता स्थानिक बाजारात जाणार असल्याने कुप्यांवरील लेबल बदलावे लागतील.
राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा व्हावा यासाठी सिरमशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे. देशात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण केलं जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यांकडून मागणी होत आहे.
“कोविशिल्ड लसीचे हे ५० लाख डोस आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. राज्यांना हे डोस मिळवण्यास सागंण्यात आलं आहे. खासगी रुग्णालयंदेखील हे लसीचे डोस मिळवू शकतात,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.