मुख्य मंदिरात 'दगडूशेठ' च्या श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना साधेपणाने संपन्न

 
मुख्य  मंदिरात 'दगडूशेठ' च्या श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना साधेपणाने संपन्न

➤श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; 
➤उत्सवकाळात मंदिरात दर्शनासाठी कार्यकर्ते देखील जाणार नाहीत - ट्रस्टचा मोठा निर्णय ; 
➤मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई , गणेश परिवारातील मूर्ती विराजमान 

पुणे : गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी हा सोहळा साधेपणाने संपन्न झाला. श्रींच्या मूर्ती शेजारी गणेश परिवारातील मूर्तीदेखील विराजमान झाल्या होत्या. उत्सवकाळात देखील मंदिर बंद राहणार असल्याने कार्यकर्ते मंदिरात दर्शनासाठी जाणार नसल्याचा मोठा निर्णय ट्रस्टतर्फे घेण्यात आला आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी गणेश चतुर्थीला सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, कुमार वांबुरे प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा पार पडला. उत्सवकाळात देखील मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. 

गणेश चतुर्थीच्या दिवशी आलेल्या भाविकांनी मंदिरावरील आकर्षक विद्युतरोषणाई पाहण्यासोबतच रस्त्यावरुन बाहेरुनच दर्शन घेत कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी श्रीं ची चरणी प्रार्थना केली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व आॅनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.  


ॠषीपंचमीनिमित्त आॅनलाईन अथर्वशिर्ष पठणाचा कार्यक्रम 

ॠषीपंचमीनिमित्त दरवर्षी हजारो महिला एकत्र येऊन गणरायासमोर अथर्वशिर्षाचे पठण करतात. यंदा सार्वजनिक प्रकारे कार्यक्रम करता येत नसला तरी ही अथर्वशिर्ष पठणाची परंपरा खंडित होणार नाही. रविवार, दिनांक २३ आॅगस्ट रोजी पहाटे ६ वाजता प्रातिनिधीक स्वरुपात महिला अथर्वशिर्ष पठण आणि श्री गणेशाची महाआरती आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनामुळे घरी राहून साधेपणाने आपण गणेशोत्सव साजरा करीत आहोत. ट्रस्टच्या  dagdushethganpati या यूट्यूब चॅनलवर हा सोहळा लाईव्ह होणार आहे.  घरबसल्या यामध्ये सहभागी होण्यासाठी व रजिस्टर करण्यासाठी 


या लिंकवर क्लिक करावे. 

आॅनलाईन कार्यक्रम 

आॅनलाईन पद्धतीने अनेक धार्मिक, सांस्कृ तिक कार्यक्रमांचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार, दिनांक ३१ आॅगस्टपर्यंत दररोज दुपारी ४ वाजता ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवरुन निरुपणकार गाणपत्य स्वानंद पुंड शास्त्री, वणी, यवतमाळ हे अथर्वशिर्षावर निरुपण करीत आहेत. तसेच स्वरपूजा या आॅनलाईन कार्यक्रमातून दिनांक ३१ आॅगस्टपर्यंत दररोज विविध कलाकारांनी श्रीं ची चरणी अर्पण केलेली गायनसेवा गणेशभक्तांना घरी बसून अनुभविता येणार आहे. 

मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम 

मुख्य मंदिरामध्ये दररोज पहाटे ५ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त, सकाळी ६ वाजता श्री गणपती महाअभिषेक, सकाळी ७.३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता विशेष महामंगल आरती होणार आहे. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली दररोज श्री गणेशयाग होणार आहे. यावर्षी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. भक्तांनी नाव व गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल. मंदिरात दररोज सत्यविनायक पूजा होणार असून शनिवार, दिनांक २९ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मंत्रजागर होईल. उत्सवात दिनांक ३१ आॅगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजता वेदमूर्ती मधुकर जांभेकर, वेदमूर्ती धनंजय घाटे यांच्या पौरोहित्याखाली श्रीं चे सहस्त्रावर्तन होणार आहे. श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे.


From Around the web