खंडणीखोर रवींद्र बऱ्हाटे पुणे पोलिसांना सापडेना

 

 

खंडणीखोर रवींद्र बऱ्हाटे पुणे पोलिसांना सापडेनापुणे  : माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून अनेकांना ब्लॅकमेल करणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्यास फरार घोषित केले आहे. 


माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्यावर खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक असे सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. 

अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बऱ्हाटे याने अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर बऱ्हाटे पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याला पुणे पोलिसांनी 23 ऑक्‍टोंबर रोजी फरारी घोषित केले आहे.


 बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडे खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मात्र बऱ्हाटे हा पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून शहरातून पसार झाला आहे. बऱ्हाटेची लुल्लानगर, धनकवडीतील तळजाई पठार येथे घरे आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तेथे छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहे. मात्र बऱ्हाटे पोलिसांच्या हाती सापडला नाही.


तर येथे संपर्क साधा :

बऱ्हाटेबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित कोथरूड पोलिस ठाण्याशी (दूरध्वनी क्रमांक 020-25391010 किंवा 25391515 ) संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन कोथरूड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी केले आहे.


हजर होण्याच्या फर्मानाचे शहरात फलक :

बऱ्हाटेने न्यायालयात हजर होण्याचे फर्मान जाहीर करण्यात आले होते. त्याचे फलक शहरातील काही भागात लावण्यात आले आहेत. बऱ्हाटेने सात नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर न्यायालयातील न्यायालय क्रमांक एकसमोर उपस्थित व्हावे, असे या फलकातील फर्मानात नमूद आहे.

From Around the web