पुण्याचा आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेची स्थावर मालमत्ता जप्त होणार

पुणे : माहिती अधिकाराचा गैरवापर करून संघटितरित्या खंडणी वसूल, जीवे मारण्याची धमकी, बंगला बळकाविण्याऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याची स्थावर मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरु केल्या आहेत. न्यायालयाचे आदेश येताच, ही कारवाई होणार आहे.
रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. मधुसुधा अपार्टमेंट, लुल्लानगर, बिबवेवाडी) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मालमत्ता जबरदस्तीने घेणे, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ, धमकाविणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे, त्यासह महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पहिला गुन्हा कोथरुड पोलिस ठाण्यात
बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध पहिला गुन्हा 7 जुलै 2020 रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर 12 जुलै रोजी समर्थ पोलिस ठाण्यातही एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून 72 लाख रुपये घेऊन आणखी पावणे दोन कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तिसरा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाला, त्यामध्ये कोथरूड व औंध येथील जमिनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवून एकाची तीस लाख रुपयांची फसवणूक केली होती. तर चौथा गुन्हा केटरिंग व्यावसायिकाने दाखल केलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिस ठाण्यातच दाखल झाला होता. त्यापाठोपाठ अन्य पोलिस ठाण्यातही बऱ्हाटे विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. बहुतांश गुन्ह्यात बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटितपणे कट रचून नागरिकांना धमकाविणे, खंडणी मागणे, मालमत्ता बळकाविणे, जीवे मारण्याची धमकी देणे या स्वरूपाचे गंभीर गुन्हे केल्याचे दाखल गुन्ह्यांमध्ये स्पष्ट झाले होते.
माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह १३ जणांच्या टोळीविरुद्ध पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. सुप्रीम कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतरही तो पोलिसांना शरण आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरु केल्या आहेत. न्यायालयाचे आदेश येताच, ही कारवाई होणार आहे.
रवींद्र बऱ्हाटे याच्या नावावर कोट्यवधींची स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेवर टाच येणार असल्याने बोगस आरटीआय कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.