कोरोनाचे गांभीर्य ओळखून कोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी कोणीही गर्दी करू नये : रिपाइं

विजयस्तंभ पारंपरिक कार्यक्रमाला विरोध केल्याचा आरोप बिनबुडाचा : डॉ. सिद्धार्थ धेंडे
 
कोरोनाचे गांभीर्य ओळखून कोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी कोणीही गर्दी करू नये : रिपाइं

पुणे : "कोरोनाचे गांभीर्य ओळखून आंबेडकरी संघटनांनी व अनुयायांनी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे जाऊन गर्दी करू नये. शासनाने विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम करावा. आम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्था, संघटनेला विरोध केलेला नाही. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन यंदा कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ परिसरात सार्वजनिक कार्यक्रम होऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे. मात्र काही लोकांनी आमचा विजयस्तंभ मानवंदना पारंपरिक कार्यक्रमाला विरोध असल्याचा भ्रम निर्माण केला आहे. या बाबतीत कोणीही राजकारण करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे," असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) नेत्यांनी केले.

दोन दिवसांपूर्वी सर्जेराव वाघमारे व अन्य सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिकन पक्षासह इतर स्थानिक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करत असल्याचा आरोप केला होता. वाघमारे यांच्या आरोपाचे खंडन करत 'रिपाइं' नेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्यासह भाई विवेक चव्हाण, राहुल डंबाळे आदींनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, "गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. अजूनही कोरोनाचे सावट आहे. या काळात पंढरीची वारी, गणेशोत्सव, ईद, गुड फ्रायडे, दिवाळी, दसरा अशा कोणत्याही धर्माचे सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या, विविध महत्वाचे दिवस साजरे झालेले नाहीत. सर्व धर्मियांनी, राजकीय पक्षांनी सार्वजनिक कार्यक्रमाच्या मर्यादा पाळल्या आहेत. मग आपण त्याला अपवाद का ठरावे? विजयस्तंभ मानवंदना सार्वजनिक स्वरूपात होण्याचा अट्टाहास कशासाठी? याचा आपण विचार केला पाहिजे. आंबेडकरी समाज शिस्तप्रिय आणि समजूतदार आहे, हे आपण दाखवून द्यावे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी लाखो नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा किंवा साथ प्रतिबंध कायदा मोडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये."

परशुराम वाडेकर म्हणाले, "गेल्या ४५ वर्षांपासून 'रिपाइं'सह अन्य जुन्या संघटनांना विजयस्तंभ परिसरात जाहीर कार्यक्रम घेण्याची परंपरा असतानाही आम्ही सर्व यंदा कोरोनामुळे नागरिकांचे हित लक्षात घेता कोणतेही कार्यक्रम घेण्याचे टाळले आहे. मात्र, काही लोक चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करत असून, समाजबांधवात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाप्रमाणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमही प्रशासनाने करावा. इतर कोणत्याही संघटनांना हस्तक्षेप करू देऊ नये. आपली दुकानदारी मांडण्याचा काहीजण प्रयत्न करताहेत. त्यांना आळा घालावा. अशा कुप्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी नियमावली जाहीर करावी."

बाळासाहेब जानराव म्हणाले, "प्रशासनाने यंदा कोणालाही कार्यक्रम करण्याची परवानगी देऊ नये. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शासकीय पातळीवरून मानवंदनेचा कार्यक्रम व्हावा. पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडलेली भूमिका समजून न घेता काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करत आहेत. नागरिकांच्या आरोग्याला आपण प्राधान्य देण्याची गरज असून, तिथे गर्दी करून लोकांना कोरोनाच्या संकट लोटत नाहीत ना, याचा विचार आपण केला पाहिजे. इतर धर्मियांनी जशी शांतता आणि संयम ठेवला, तसाच आपण समजूतदारपणा दाखवावा. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर पुढील वर्षी आपण हा कार्यक्रम जल्लोषात करू शकतो."

संजय सोनवणे म्हणाले, "रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रशासनाची परवानगी घेऊन केवळ पाच लोक मानवंदना देण्यासाठी जातील. इतर सर्व कार्यकर्त्यांनी घरातूनच विजयस्तंभ मानवंदनेचा कार्यक्रम करावा. कोणत्याही कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन करून कोरेगाव भीमा परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पक्षाच्या वतीने करतो."
 

From Around the web