अधिकाऱ्यांचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी

राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय
 
s
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ

मुंबई  - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील हे अनुकंपा धोरण लागू करावे.

कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांची देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून " महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१ तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ

 आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

कोरोना महामारी सुरु असेपर्यन्त आशा स्वयंसेविका व आशा गटप्रर्वतक यांना  दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रस्तावित वाढ जुलै 2021 या महिन्यापासून देण्यात येईल. यासाठी होणा-या अंदाजे 135 कोटी 60 लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली.

From Around the web