संघर्षा सोबतच सेवेतही श्रमजीवी आघाडीवर

एकलव्य गुरुकुल शाळेचे कोविड सेंटर मध्ये रूपांतर
 
संघर्षा सोबतच सेवेतही श्रमजीवी आघाडीवर
या काळात सेवेसाठी पुढे येणे हे राष्ट्रीय कर्तव्य-विवेक पंडित

अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठवणारी श्रमजीवी संघटना संघर्षासोबत सेवा कार्यातही आघाडीवर असते. कोरोना काळात मागील वर्षी श्रमजीवी संघटनेने केलेला संघर्ष आणि सेवाही सर्वांनी पहिली. यावेळीही कोविड केअर सेंटर साठी श्रमजीवीने संघर्ष केला, आताही कोविड संकटात श्रमजीवी सेवेतही आघाडीवर असेल. उसगाव हे श्रमजीवीचे मुख्यालय आहे, याठिकाणीच आता महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद पालघर यांच्या सहयोगाने श्रमजीवी कोविड केअर सेंटर उभारुन पूर्ण झाले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना विलगिरणासाठी विधायक संसद या संस्थेची एकलव्य गुरुकुल ही शाळा आता 100 बेड च्या कोविड केअर सेंटर मध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. या काळात सेवेसाठी पुढे येणे म्हणजे राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावणे असे आहे असे मत यावेळी विवेक पंडित यांनी व्यक्त केले.

या महामारीच्या काळात श्रमजीवी संघटनेने विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. यात जगा आणि जगवा या अभियानांतर्गत ठाणे ,नाशिक,पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यात बुधवार( ता.28) पासून श्रमजीवीचे प्रत्येक तालुक्यातील 100 ते 120 प्रशिक्षित सक्रिय कार्यकर्ते गावागावात फिरून लोकांचे ऑक्सिजन लेव्हल, ताप आणि इतर लक्षणे तपासण्याचे काम करत आहेत. लोकांना टेस्ट करणे, लसीकरण करणे यासाठी प्रेरित करत आहेत. सोबतच आता उसगाव डोंगरी या श्रमजीवीच्या मुख्यालयात हे कोविड सेंटर सुरू झाल्याने जिल्ह्यातील लोकांना दिलासा मिळणार आहे. यासाठी पालघर जिल्हा परिषद सहकार्य करत असून विवेक पंडित यांच्या देखरेखीखाली श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा,बाळाराम भोईर, विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, महेश धांगडा, ममता परेड, ऍड पूजा सुरुम,निलेश वाघ यांच्यासह श्रमजीवीची स्वयंसेवकांची फौज गेले 10 दिवस, दिवस-रात्र काम करताना दिसत आहे.

या विलगिकरण केंद्रात दवा उपचारासह रुग्णांची सकारात्मक मानसिकता तयार होण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम आखले गेले आहेत. यात काही खेळांचा आणि प्रोत्साहनपर कार्यक्रमाचा सहभाग आहे.

1 मे पासून हे केंद्र सुरू होत असून लक्षणे आढळल्यास या ठिकाणी या टेस्ट करून येथे दाखल व्हा, आणि आपल्यापासून इतरांना कोरोनाची बाधा होण्यापासून रोखा असे आवाहन श्रमजीवी, विधायक संसद चे संस्थापक आणि राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी केले आहे. या कोविड सेंटर उभारणीच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी, वसईची गटविकास अधिकारी भारत जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब जाधव इत्यादींनी भेटी दिल्या आहेत.

From Around the web