कोकण महामार्ग समन्वय समिती अभ्यास दौऱ्यातून जनजागृती 

चौपदरीकरण पूर्ण  नाही तर टोल ही मिळणार नाही : यादवराव  
 
कोकण महामार्ग समन्वय समिती अभ्यास दौऱ्यातून जनजागृती

पुणे : कोकण भुमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी स्थापन केलेल्या कोंकण महामार्ग समन्वय समितीचा  अभ्यासदौरा १७,१८  डिसेंबर रोजी  आयोजित करण्यात आला होता.या समितीत  यादवराव यांच्यासह अनेक तज्ञ,निवृत्त अधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहिले. महामार्गाच्या कामांमधील त्रुटींची पाहणी करुन सविस्तर अहवाल शासनाला देऊन दर्जेदार महामार्गासाठी जनजागृती करून  व्यापक जनआंदोलन उभारण्याचा हा प्रयत्न आहे .चौपदरीकरण झालेला   चांगला महामार्ग कोकण वासियांना मिळाला नाही  तर टोल ही मिळणार नाही',अशी भूमिका संजय यादवराव यांनी जाहीर केली.   

  संजय यादवराव,यशवंत पंडित,जगदीश ठोसर,एड संदीप चिकणे,सतीश लळीत,विकास शेट्ये,राजू भाटलेकर,युयुत्सु आर्ते,पंडित रावराणे,विलास आंब्रे,राजू आंब्रे यांच्यासह अनेक मान्यवर या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले. खेड ते हातखंबा या टप्प्याचा दौरा १७ डिसेंबरला,हातखंबा ते खारेपाटण या टप्प्याचा दौरा १८ डिसेंबरला  आयोजित करण्यात आला होता.   

  मुंबई कोंकण महामार्गाच्या चारपदरी रुंदीकरणाचे काम गेली  दहा वर्षे रखडत सुरु आहे.कोंकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा या प्रकल्पाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.यामुळे उन्हाळी सुटीत किंवा गौरीगणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांना पुणे, कोल्हापूरमार्गे कोंकणात यावे लागते.याशिवाय सद्या जे अर्धवट काम झाले आहे, त्यामुळे वारंवार अपघात होऊन निरपराध नागरिक प्राणाला मुकत आहेत. 
    
पर्यटन आणि इतर व्यवसायांना उतरती कळा लागण्यास हा रेंगाळलेला  महामार्ग आहे.दहा वर्षे रेंगाळलेल्या कोकणातील महामार्गाच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी अभियानास ७ डिसेंबर पासून प्रारंभ करण्यात आला. सध्या सुरु असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकण वासियांच्या समितीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा करण्यात आला .' कोकणात दर्जेदार कोकण हायवे तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे,असे कोकण भूमी प्रतिष्ठांनचे अध्यक्ष आणि'समृद्ध कोकण महामार्ग अभियान'चे प्रणेते  संजय यादवराव यांनी सांगितले. 

राज्यातील इतर महामार्गाच्या कामांना गती मिळाली असून कोकणावर अन्याय होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व टप्प्यांच्या अभ्यासानंतर पुढील कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. कोकण वासियांनी सोशल मीडिया कॅम्पेन  सुरू करावी , एक व्यापक लोकचळवळ आणि दबावगट निर्माण करावा ,वेळ पडल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी ,असेही आवाहन संजय यादवराव आणि समिती सदस्यांनी केले आहे.  
                                                                   

From Around the web