नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

मुंबई - खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.
चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा रेमडेसिवरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना मनाई केली, असा खोडसाळ आणि असत्य आरोप नवाब मलिक यांनी ट्वीट करून केला. या त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा त्यांनी आतापर्यंत दिलेला नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला, राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहचवले, कोरोनाच्या महासाथीत अफवा पसरवली तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी तसेच त्यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंदवून कायद्याच्या योग्य कलमांनुसार शिक्षा घडवावी.
संजय राऊत, आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी लगावला.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या साथीबद्दल बोलताना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असे ट्वीट आज सकाळी केले आहे. ही अभूतपूर्व स्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळीकडे नुसता गोंधळ आणि तणाव आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे अचूक आहे पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे. संपूर्ण देशात अशी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती तर तसे करणे योग्य झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल. संजय राऊत हे शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आणि या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला या प्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा.