सीबीआयने धाडसत्र सुरु करताच जयंत पाटील संतापले 

अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर - जयंत पाटील
 
सीबीआयने धाडसत्र सुरु करताच जयंत पाटील संतापले

मुंबई - १०० कोटीच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल करून घर आणि ऑफिसवर धाडसत्र सुरु करताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चांगलेच संतापले आहेत. न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करतानाच या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही असेही जयंत पाटील म्हणाले.


ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. 


सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय  - नवाब मलिक 

सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. 

सीबीआयला संशय असेल तर चौकशी किंवा धाडी टाकू शकतात शिवाय गुन्हा दाखल करु शकते परंतु पहिल्या दिवसापासून ज्यापध्दतीने हे प्रकरण तयार करण्यात आले आहे यावरुन हे राजकारणच सुरू असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. 


मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देऊन अहवाल सादर करायला सांगितले होते. परंतु ज्यापध्दतीने आज सीबीआयने धाडसत्र सुरू केले आहे त्यावरुन मुंबई उच्च न्यायालयासमोर सीबीआयने प्राथमिक अहवाल ठेवला का? कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय किंवा आदेश दिला आहे का? याबाबतची माहिती समोर आलेली नाही किंवा आमच्याकडे उपलब्ध नाही असे नवाब मलिक म्हणाले. 


कायद्यापुढे कुणीही मोठा नाही. अनिल देशमुख यांनी सुरूवातीपासून सीबीआय चौकशीला सहकार्य केले आहे. घटना ही अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या बॉम्बची आहे. त्यामध्ये आजपर्यंत सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून काम करत होता. याबाबतचा NIA ने खुलासा केलेला नाही. याशिवाय यामध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांची भूमिका काय होती? त्यांच्या पत्रावरून कारवाई होतेय हे राजकारण सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

From Around the web