नाना पटोले यांनी काँग्रेसच्या बंद पडलेल्या इंजिनची चिंता करावी

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतुत्वाखाली केंद्र सरकराने इंजिन मजबूत आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या बंद पडलेल्या इंजिनची चिंता करावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मारला आहे.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाना पटोले यांनी, डब्बे बदलून चालणार नाही तर इंजिन बदलावे लागेल, अशी टीका केली होती, त्या टीकेला आठवले यांनी आपल्या शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे.
देशाचे इंजिन बदलणे येड्या गबाळ्याचे काम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतुत्वाखाली केंद्र सरकार चांगले काम करीत आहे. त्यांच्या रूपाने भाजप आणि एनडीएला मजबूत आणि वेगवान इंजिन मिळाले आहे. देशाची जोरदार प्रगती होत आहे, असेही आठवले म्हणाले.
काँग्रेस म्हणजे बंद पडलेले इंजिन आहे.नाना पटोले यांनी त्याची चिंता करावी. महाराष्ट्रात नितीन राऊत आणि पटोले यांचा वाद सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहचला आहे. त्याची त्यांनी चिंता करावी, असेही आठवले म्हणाले.