राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल 

 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख  यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.  बायजीपुरा भागात खाजगी शिकवणी घेणार्‍या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणांशी आपला काहीही संबंध नसून, महिलेचा बोलविता धनी कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, असे आव्हान मेहबूब  शेख यांनी दिले आहे. 


औरंगाबाद शहरातील बायजीपुरा  भागात राहणाऱ्या तरुणीचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. ती घरगुती शिकवणी घेते. त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी सुरू करायची असल्याने ती बायपास परिसरात खोली भाड्याने घेण्यासाठी गेली असता. त्याठिकाणी तिची बीड जिल्ह्यातील शिरूर कासारमधील मेहबूब इब्राहिम शेख यांच्याशी भेट झाली.


त्यांनंतर तिचे शिक्षण किती झाले विचारून तुला मुंबईत नोकरी लावून देतो असे आमिष महेबूब शेख यांनी दाखवले. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेल समोर पोहोचले असता मेहबूब कार घेऊन त्या ठिकाणी उभे होते.  तरुणी मागील सीटवर बसली असता त्यांनी वसंतराव नाईक कॉलेज जवळ निर्मनुष्य ठिकाणी थांबून तर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही' असे म्हणून तिला कारमधून उतरून दिले. घटनेनंतर तरुणीच्या मावशीने धीर दिल्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार केली. याप्रकरणी औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यांमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यावर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या मेहबूब शेख यांनी मात्र गावात या नावाचा माझ्या व्यतिरिक्त दुसरा कुणी व्यक्ती नाही. मग जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यातील मेहबूब इब्राहाीम शेख कोण? असा उलट सवाल पोलीसांनाच केला आहे. शिवाय याचा लवकरात लवकर शोध लावून या मागचा खरा सूत्रधार कोण? हे पोलीसांनी शोधावे, असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.


आमची नार्को टेस्ट करा...

 राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहीम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी तसेच गुन्हा दाखल झालेला मेहबूब शेख कोण? याचा तपास लावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली आहे. एक व्हिडिओ जाहीर करत त्यांनी शिरूर कासार येथे मेहबूब इब्राहीम शेख माझ्या शिवाय दुसरा कुणी नाही, हे स्पष्ट करतांनाच जो गुन्हा पोलीसांनी दाखल केला आहे, त्यातील व्यक्ती मी आहे, की मग अन्य कुणी याचा खुलासा करावा, अशी मागणी पोलीसांकडे केली आहे.

सदर महिलेने फिर्यादीत उल्लेख केलेल्या १० आणि १४ नोव्हेंबरला मी मुंबईत पक्षाच्या कार्यक्रमासाठी व आपल्या गावी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित महिलेला आपण कधी भेटलेलो नाही, पाहिलेले नाही, माझा तिचा काही संबध नाही. तुम्ही माझे काॅल डिटेल तपासा, नार्को टेस्ट करा, मी दोषी असेल तर मला शिक्षा करा. पण जर ती व्यक्ती अन्य कुणी असेल तर ती कोण, सदर महिलेचा बोलवता धनी कोण? याची देखील पोलीसांनी तातडीने चौकशी करावी. मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा हा डाव असून या मागे कोण आहेत ते पोलीसांनी शोधून काढावे. तक्रारदार महिलेची आणि माझीही नार्को टेस्ट करा, आणि ती प्रसारमाध्यांकडे जाहीर करा, असे आव्हान देखील मेहबूब शेख यांनी पोलीसांना दिले आहे.

पाहा काय म्हणाले , महेबूब शेख ...


 

From Around the web