कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी आणि हतबल - नवाब मलिक 

 
कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी आणि हतबल - नवाब मलिक

मुंबई - आजच्या घडीला देशामध्ये दरदिवशी ४ लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ही कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच शिवाय हतबलही झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.


सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने कोरोना परिस्थितीसंदर्भात आदेश देऊन केंद्रसरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. मात्र केंद्रसरकार यामध्ये हतबल झाल्याचे दिसून येत आहे.


राज्यांना ऑक्सिजन साठा निश्चित केल्यानंतरही दिला जात नसल्याची सत्यपरिस्थिती आहे. दोन दिवसापासून कर्नाटकच्या प्लांटमधून येणारा ५० टँकचा कोटा राज्याला मिळेनासा झाला आहे. रेमडेसिवीरचा साठा देऊनही वेळेत वितरीत करता येत नाहीय असेही नवाब मलिक म्हणाले.


लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला आहे. पहिला डोस घेतलेले साडेचार लाख लोक आहेत. ते दुसरा डोस घेण्यास पात्र असताना डोस देता येत नाहीय. शिवाय राज्यसरकारने ठरवलेल्या कार्यक्रमासाठी कंपन्यांकडून लस नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले. 


मोदी सरकार फक्त भाषणे आणि घोषणा करणे व वेळकाढूपणा करणे ही भूमिका घेत आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळत नाहीय, रेमडीसीवीर वेळेत पुरवठा होत नाहीय, आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाहीय. जाणूनबुजून केंद्रसरकार अन्याय करतेय की, केंद्रसरकारला काम करता येत नाही असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. 


दरम्यान लवकरात लवकर लस द्या, ५० टन ऑक्सिजन कोटा पडून आहे. शिवाय रेमडेसिवीरचा साठा तात्काळ द्या अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

From Around the web