भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार 

सीबीआयविषयीच्या आरोपांबाबत इशारा
 
भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार

पिंपरी - चिंचवड :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू असली तरीही ही चौकशी म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान असून भाजपा त्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल करेल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पिंपरी येथे सांगितले. 

 चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचा आदेश देताना गरज असल्यास गुन्हा नोंदविण्याचाही आदेश दिला होता. न्यायालयाचे निकालपत्र वाचले तर हे स्पष्ट होते. त्यामुळे केवळ चौकशीचा आदेश दिला होता तरीही गुन्हा नोंदवून छापे मारले ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रारही निरर्थक आहे. 

ते म्हणाले की, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सोईच्या भूमिका असतात. त्यांना अनुकूल निकाल लागला की न्यायालय चांगले आणि प्रतिकूल आदेश आला की शंका उपस्थित करतात. ईव्हीएम मशिनबाबतची त्यांची भूमिकाही निवडणुकीत विजय मिळाला अथवा पराभव झाला यानुसार बदलते. अशी ‘हम करे सो कायदा’, ही त्यांची भूमिका लोकशाहीत चालणार नाही.

त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीला जनतेने विधानसभा निवडणुकीत जनादेश दिला होता. विश्वासघात झाल्यामुळे भाजपा सत्ताधारी होण्याच्या ऐवजी विरोधी पक्ष झाला. परंतु, विरोधी पक्ष म्हणूनही भाजपा आपली भूमिका गंभीरपणे आणि आक्रमकपणेच पार पाडेल. सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवण्याची विरोधी पक्षाचे काम भाजपा चांगल्या रितीने पार पाडतच राहील.

From Around the web