अक्षयतृतीयेनिमित्त 'दगडूशेठ गणपती'ला ११११ आंब्याचा नैवेद्य

पुणे - अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११११ आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावर्षी कोविडच्या पार्श्र्वभूमीवर मंदिरात साधेपणाने आंब्यांची आरास करण्यात आली.
अक्षय तृतीयेला दरवर्षी मंदिरात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आरास व पुष्परचना करण्यात येते. मात्र, यावर्षी कोविडच्या पार्श्र्वभूमीवर अत्यंत साधेपणाने ही आरास करण्यात आली. देसाई बंधू आंबेवाले चे मंदार देसाई यांनी दरवर्षीप्रमाणे आंबे देऊन श्री चरणी सेवा अर्पण केली.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. परंतु दरवर्षीप्रमाणे आंब्यांची आरास मंदिरात करण्यात आली आहे. गणरायाला नैवेद्य दाखवलेला हा आंब्यांचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्ण, पिताश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ आणि खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील सैनिकांना देण्यात येणार आहे.
मंदिर बंद असले तरीही दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरु आहेत. भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी आॅनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी घराबाहेर न पडता घरबसल्या दर्शन घ्यावे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.