श्रीराम मंदिराकरीता श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाखांचा निधी

साध्वी ॠतंभरा यांच्याकडे पहिल्या टप्प्यातील ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द
 
श्रीराम मंदिराकरीता श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाखांचा निधी

पुणे : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या भव्य मंदिर निर्माण श्रद्धा निधी अभियानासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. पुण्यामध्ये या अभियानासाठी आलेल्या पू.साध्वी ॠतंभरा जी यांच्याकडे पहिल्या टप्प्यातील ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राम मंदिर निर्माण कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, अशी प्रार्थना पू.साध्वी ॠतंभरा जी यांनी गणरायाचरणी केली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे पू.साध्वी ॠतंभरा जी यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी उपस्थित होते. पू.साध्वी ॠतंभरा जी यांनी गणरायाला अभिषेक देखील केला. तसेच त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. 

पू.साध्वी ॠतंभरा जी म्हणाल्या, लवकरच संपूर्ण जग अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्यतेचे दर्शन करेल. परमेश्वराच्या सर्व शक्ती आज दगडूशेठ गणपती मंदिरावर आर्शिवादाचा वर्षाव करीत आहेत. रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाच्या चरणी जे मागितले होते, ते चार महिन्यांतच मिळाले. आता राममंदिराच्या माध्यमातून हिंदूंचा जो संकल्प आहे, तो निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत. तसेच फक्त मंदिर न बनविता मंदिरे पुन्हा कधीही उध्वस्त होऊ नये, अशा भारताची निर्मीती करुया, असेही त्यांनी सांगितले.

अशोक गोडसे म्हणाले, अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मीतीकरीता संपूर्ण जगभरातून निधी येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे खारीचा वाटा म्हणून ५१ लाख रुपयांचा निधी आपण देत आहोत. मंदिर निर्मीतीचे कार्य लवकरात लवकर आणि निर्विघ्नपणे पार पडावे, अशी प्रार्थनाही त्यांनी श्रीं चरणी केली.

From Around the web