महाविकास आघाडी सरकारवरील संताप पंढरपूरमध्ये व्यक्त झाला

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया
 
महाविकास आघाडी सरकारवरील संताप पंढरपूरमध्ये व्यक्त झाला

पुणे  - राज्यातील जनता शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराला वैतागली असून या सरकारबद्दलचा संताप पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत व्यक्त झाला, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केली.

 चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि मतदारांचे आभार मानले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला वैतागली आहे, विजेची कनेक्शन कापणे, वेगवेगळी नुकसानभरपाई खात्यात जमा नाही, शेतकऱ्यांना मदत नाही, पीकविम्याचा लाभ नाही, कोविडच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना पॅकेज नाही, जे तुटपुंजे पॅकेज दिले त्याची अंमलबजावणी नाही, अशा अनेक प्रश्नांनी लोक हैराण झाले आहेत. लोक निवडणुकीची वाट पाहत होते. ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट झाली.

त्यांनी सांगितले की, लोकांच्या मनात आघाडी सरकारबद्दल राग आहे. संधी मिळेल तेथे लोक तो व्यक्त करतात. ग्रामपंचायत निवडणुकीतही साडेचौदा हजार पैकी सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपाला विजय मिळाला. महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास उडाला आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत, हे या पोटनिवडणुकीतील जनतेच्या कौलावरून दिसून आले आहे.

आ. प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांनी एकदिलाने भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना साथ दिली, त्यामुळे विजय मिळण्यास हातभार लागला. या विजयाबद्दल आपण परिचारक यांचेही अभिनंदन करतो, असे त्यांनी नमूद केले.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय हा पक्षाच्या संघटनात्मक शक्तीचा विजय आहे. पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन त्यांना जबाबदारी दिल्याप्रमाणे कामगिरी केली. संघटित शक्तीतून हा विजय मिळाला. दहा मतदारांच्या गटाची जबाबदारी एकेका कार्यकर्त्याला इतके सूक्ष्म नियोजन या निवडणुकीत केले होते, त्याचा परिणाम झाला. पंढरपूरच्या विजयाने बरेच काही शिकायला मिळाले, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

त्यांनी सांगितले की, आसाममध्ये भाजपा सत्ता राखत आहे. पाँडेचरीमध्ये भाजपा आघाडी सत्तेवर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला गेल्या वेळच्या तीन जागांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात जागा यावेळी मिळत आहेत. देशामध्ये भारतीय जनता पार्टी हा अत्यंत प्रबळ पक्ष म्हणून पुढे आला आहे व त्याच्या विरोधात इतर सर्वांना एकत्र यावे लागते हे या निवडणुकीत पुन्हा स्पष्ट झाले. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व डाव्यांनी निवडणुकीतून जवळजवळ माघार घेतली. भाजपाच्या विरोधात काहीजण उघडपणे एकत्र लढतात तर काहीवेळा उघडपणे एकटा लढतो आणि पाठीमागून बाकीचे लढतात. पश्चिम बंगालमध्ये दुसरा प्रकार दिसला. तेथे भाजपाविरोधात छुपेपणाने सगळे एकत्र आले व धृविकरण झाले.

पंढरपूरच्या निकालातून राज्य सरकार विरोधातील असंतोष प्रकट - केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे 

मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या समाधान अवताडे यांनी मिळवलेल्या विजयातून आघाडी सरकारविरोधातील असंतोष प्रकट झाला आहे , अशी प्रतिक्रिया केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली आहे.

रावसाहेब पाटील दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , या विजयाबद्दल अवताडे यांचे अभिनंदन. अवताडे यांच्या विजयामुळे  राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा काय असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. मुळात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीला बहुमत मिळाले होते. असे असताना  भाजपाशी  दगाफटका करुन शिवसेनेने  हे सरकार बनवलं .ही दगाबाजी जनतेला मान्य नाही , हेच या निकालातून दिसले आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यातील विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. तीन पक्षाचे सरकार आहे मात्र तिन्ही पक्षांमधे समन्वय नाही. आपल्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे.

विविध कारणांमुळे शेतकरी, शेतमजूर  अडचणीत आलेले आहेत.नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची  भरपाईही या सरकारने अद्याप दिलेली नाही. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालामुळे राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आणि नगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये या तिन्ही पक्षांचा सफाया होणार आहे , असेही रावसाहेब पाटील दानवे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

From Around the web