ज्ञानाच्या शोधात; समाधानात राहा : अभिजित पवार

 
पुणे स्टार्टअप फेस्ट 2020 चा समारोप

ज्ञानाच्या शोधात; समाधानात राहा : अभिजित पवार
पुणे : ज्ञानाच्या शोधात आणि समाधानात राहा, असा कानमंत्र 'सकाळ' माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि डिलिव्हरिंग चेंज फोरमचे संस्थापक अभिजित पवार यांनी आज येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आणि नवउद्योजकांना दिला. 'स्टे वाईज; स्टे सॅटिस्फाईड,' अशी यशाची नवी व्याख्या करताना श्री. पवार यांनी, "यश समाजाच्या भल्याशी जोडले पाहिजे,' असे आग्रहाने सांगितले. "आपण जो काही व्यवसाय, उद्योग करू त्याचा फायदा समाजाला झाला पाहिजे आणि समाजाचे भले झाले पाहिजे अशी भूमिका ठेवा,' असे आवाहनही त्यांनी केले.

शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय (सीओईपी) आणि भाऊ आंत्रप्रेन्युअरशीप सेलतर्फे आयोजित दोन दिवसांच्या "पुणे स्टार्टअप फेस्ट 2020' च्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

"सीओईपी'चे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, "ओला'चे वरिष्ठ सल्लागार डॉ. श्रीनिवास चंद्रू, पॉल कॅबचे विभागीय व्यवस्थापक हितेन कोल्हे, डॉ. एम. जी. कर्नीक, विद्यार्थी प्रतिनिधी जागृती जेठवाणी यावेळी मंचावर उपस्थित होते.

"स्टार्टअपमध्ये अपयशाला घाबरू नका,' असे सांगताना श्री. पवार म्हणाले, "लहानपणी तुम्ही सायकल चालवायला शिकता, तेव्हा ठेचकाळता; पडताही. पण, प्रयत्न करणे तुम्ही थांबवत नाही. स्टार्टअपचेही असेच आहे. सुरूवातीला यश मिळाले नाही, म्हणून घाबरून जायचे कारण नाही. सातत्याने प्रयत्न करीत राहिले पाहिजे.'

"तुम्ही जो काही व्यवसाय सुरू करता, त्याचा फायदा समाजाला झाला पाहिजे," अशी भूमिका मांडताना ते म्हणाले, "तुम्ही दुचाकी वाहनांचा सुरू केला आणि इंधनामुळे प्रदूषण होऊन समाजाचे दीर्घकालीन नुकसान होते आहे, असे लक्षात आले किंवा रस्ते बांधतो आहोत, म्हणून झाडे कापून टाकतो आहोत, तर तुम्हाला तातडीने अॅक्शन घेता आली पाहिजे. तुमच्या व्यवसायाचे कल्याण होते आहे म्हणून दुसऱयाचे नुकसान करता कामा नये. समतोल बिघडवता कामा नये.'

श्री. पवार म्हणाले, "प्रत्येकजण अब्जाधिश उद्योगपती होईलच, असे नाही. मात्र, तुमच्यामध्ये जी कुवत, क्षमता आहे ती तुम्ही पूर्णपणे वापरता आहात का, याचा विचार करा. व्यवसाय किंवा उद्योग म्हणजे समाजातील प्रश्नांवर शोधलेले सोल्यूशन-उत्तर असते. तुम्ही जागतिक पातळवरील प्रश्नांवर उत्तर शोधले, तर तुमचा उद्योग जागतिक होईल; स्थानिक प्रश्नांवर शोधले तर स्थानिक वाढ होईल. नोकरी केलीत, तरी चालेल; मात्र, सोल्यूशन्स शोधत राहिली पाहिजेत.

"काहींना बुद्धीमत्तेची देणगी असते. कोणत्याही अपयशाविना ते करीयरचे टप्पे गाठतात. एखादे संकट कोसळले, तर तेही कोसळण्याची शक्यताच जास्त असते. कारण, त्यांनी कधी अपयशाशी सामना केलेला नसतो. करीयरमध्ये आधी अपयश आले, तर येऊ द्या. ते चांगले असते. आईवडीलांनीही मुला-मुलींना प्रयत्न करू द्यावेत. फक्त, ते जे काही करत आहेत, ते नैसर्गिक आहे; त्यामध्ये अनैसर्गिक काही नाही, याचे भान पालकांनी ठेवावे,' असे आवाहन त्यांनी पालकांना केले.

स्टे वाईज; स्टे सॅटिस्फाईड, अशी यशाची नवी व्याख्या सांगताना श्री. पवार यांनी आयुष्यभर ज्ञानाच्या शोधात राहिले पाहिजे, असा विचार मांडला. "आधी आपण ठरवले पाहिजे, की मी आयुष्यभर विद्यार्थी राहीन. विद्यार्थी म्हणजे रोज नवीन ज्ञान प्राप्त करणारा. शिवाय, जे मिळते आहे, त्यात समाधान शोधले पाहिजे. स्टे हंग्री; स्टे फुलीश यापेक्षा मला स्टे वाईज; स्टे सॅटिस्फाईड महत्वाचे वाटते. याचा अर्थ असा नव्हे, की उद्योगाचा विस्तार करायचा नाही. तो केलाच पाहिजे; मात्र आपली कंपनी युनिकॉर्न बनलीच पाहिजे, हा हट्ट नको. लाखो कंपन्या सुरू होऊन बंद पडतात, तेव्हा एखादी युनिकॉर्न कंपनी चालते. हंग्री राहण्याच्या घाईत आयुष्याच्या प्रवासाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे, वाईज आणि सॅटिस्फाईड राहणे महत्वाचे आहे.'

स्टार्टअप, नवउद्योजक, विद्यार्थ्यांसाठी पंचसूत्री
  1.  स्वतःला आयुष्यभर विद्यार्थी समजा; ज्ञानाच्या शोधात राहा
  2.  स्थानिक असो किंवा जागतिक; समस्यांवर सोल्यूशन शोधत राहा
  3.  अपयशाला घाबरू नका; लढण्याची तयारी ठेवा
  4.  समाजाच्या कल्याणाचा विचार केंद्रस्थानी ठेवा
  5. मोजता येतील, असे चांगले बदल कामातून समाजात घडवा
- अभिजित पवार

From Around the web