देशाला सुरक्षित, स्वच्छ व साक्षर बनविण्यात योगदान द्यावे

पुणे : "आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानामुळेच आपल्याला स्वतंत्र भारतात राहण्याची संधी मिळाली आहे. या स्वतंत्र भारताला सुरक्षित, स्वच्छ आणि साक्षर बनविण्यासाठी आपण प्रत्येकाने योगदान द्यायला हवे," असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरकर बोलत होते. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया हे व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभागी झाले होते. संस्थेचे समूह संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतिक्षा वाबळे, संचालक प्रशांत पितालिया, मुख्याध्यापिका सरिता नायर यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राहुल सोलापूरकर म्हणाले, "आज देशात अंतर्गत आव्हाने भरपूर आहेत. ही आव्हाने समजून घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सजग राहणे, वंचित घटकांतील लोकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा संकल्प आपण प्रत्येकाने करावा."
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "गेल्या २२ वर्षांपासून सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सर्वसमावेशक शिक्षणाचा अवलंब केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील दुर्बल, वंचित, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती दिली जाते. स्वातंत्र्यदिन केवळ समारंभ म्हणून साजरा न करता त्या दिवशी आणि तिथून पुढच्या कालावधीत प्रेरणात्मक काम उभारण्याचा दिवस म्हणून याकडे पाहते. दरवर्षी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना बोलावून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण व मार्गदर्शन होते. त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मिळतात. स्वातंत्र्यदिनानिमित्त फुड बँक, क्लोदिंग बँक असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. समाजोपयोगी उपक्रमशील प्रयत्न हे सूर्यदत्ताचे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचाही सूर्यदत्ताचा प्रयत्न असतो. काव्याथॉन हा त्याचाच भाग होता, ज्यामध्ये सलग २४ तास देशभक्तीपर गीतांचे गायन झाले होते."
प्रा. डॉ. शैलेश कासंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रद्योत राज सिंग (इंग्रजी), मृणमयी देशमुख (हिंदी) यांनी भाषण केले. ग्रीष्मा थोबडे हिने देशभक्तीपर गीते गायली. सायली देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सरिता नायर यांनी आभार मानले.