पुण्यात ‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे १२० ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर

 
पुण्यात ‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे १२० ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर

पुणे - पुण्यात ‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे १२० ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकट काळात सकाळने मदतीचा हात दिल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. 


कोरोनाचा वाढता संसर्ग, रुग्णालयांमधील बेड्सची कमतरता आणि तिसऱ्या कोरोना लाटेचा संभाव्य धोका विचारात घेऊन, शहर परिसरातील विविध रुग्णालयांमधील प्रख्यात डॉक्टर्स, ॲनेस्थेशिया असोसिएटस ग्रुप आणि पुणे महापालिकेच्या सहकार्याने गणेश कला क्रीडा रंगमंचच्या प्रदर्शन हॉलमध्ये १२० ऑक्सिजन बेड्सचे मूलभूत सोयी-सुविधा पुरविणारे कोविड सेंटर ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ रिलीफ फंड’च्या अंतर्गत सुरु करण्यात आले. 

‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे या कोविड सेंटरसाठी ३० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे सेंटर डॉ. ऋतुपर्ण शिंदे, डॉ. निखिल हिरेमठ, डॉ. संदीप पाटील, डॉ. अश्विनी जोशी आणि इतर निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सुरु राहणार आहे. तसेच, या कोविड सेंटरमध्ये ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर रुग्णांना प्रवेश दिला जाईल. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल व पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांचे सहकार्य हे सेंटर सुरू करण्यासाठी मिळाले.

....

‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ रिलीफ फंड’ ही संस्था कायमच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी, मदत कार्यासाठी धावून आलेली आहे. कोविड सेंटर उभारणे ही आजची गरज ओळखून ‘सकाळ रिलीफ फंडा’मार्फत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
- राजेश शहा, विश्वस्त, सकाळ रिलीफ फंड

...

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना ‘सकाळ रिलीफ फंडा’अंतर्गत सुरू केलेले १२० ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर निश्चितच रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कोरोना मदत प्रकल्पात सर्वांनी सहभागी व्हावे.
- डॉ. सतीश देसाई, विश्वस्त, सकाळ रिलीफ फंड

... 

पुणे शहरातील प्रख्यात डॉक्टर वर्ग एकत्र आला आणि ॲनेस्थेशिया असोसिएटस ग्रुपच्या माध्यमातून कोविड सेंटर उभा करण्याचा मानस व्यक्त केला. याला मूर्त स्वरूप ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या आर्थिक मदतीमुळे तसेच पुणे महापालिकेच्या सहकार्यामुळे मिळाले. भावे हायस्कूल आणि नूमविच्या माजी विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहकार्य केले.
- डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोग तज्ज्ञ

....


मदतीचे आवाहन

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन कमी पडत आहेत. ‘सकाळ रिलीफ फंड’ अशा कोणत्याही संकटाच्या काळात पुढाकार घेत आला आहे. या वेळीही अत्यावश्यक सुविधा निर्माण करण्याचे ‘सकाळ’ने ठरविले आहे. त्यासाठी शासकीय, खासगी रुग्णालयांना व कोविड सेंटर्स यांना बेड, ऑक्सिजन सिलिंडर व व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून समाजातील सर्व घटकांना, स्वयंसेवी संस्थांना, खासगी आस्थापनांना आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे.

अशी करा मदत:

सकाळ रिलीफ फंड
HDFC Bank,
A/C No : 57500000427822
IFSC : HDFC0000103
या खात्यावर रक्कम ऑनलाइन पद्धतीने ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता. ‘सकाळ रिलीफ फंडा’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये सवलतीस पात्र आहेत.
- अधिक माहितीसाठी व्हाट्सॲप क्रमांक : ९९६०५००१४३

From Around the web