गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा
 
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी
आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा घणाघात

पुणे- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत भ्रष्ट कारभाराचे वाभाडे निघत असून त्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. पुणे शहर भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर भाजपने अलका टॉकीज चौकात आज तीव्र आंदोलन केले.

 यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला केला. आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा सुरू असून, या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही अशी टीका श्री. पाटील यांनी केली. तसेच देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

आ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा सुरू आहे. परमबीर सिंहाच्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर नितीमत्तेची थोडीशी का होईना; पण चाड शिल्लक असेल, तर त्यांनी अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा लगेच घेतला पाहिजे, अशी मागणी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

पाटील पुढे म्हणाले की, परमबीर सिंहाच्या पत्रानंतर आता स्पष्ट झाले आहे की, राज्यातील ठाकरे सरकार अतिशय भ्रष्ट सरकार आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह जिथे सापडला, त्याच ठिकाणी काल आणखी एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे अतिशय खोलवर गेली आहेत. महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी अॅंटिलिया प्रकरणाचा मुद्दा सभागृहात मांडला नसता, तर हा विषय कधीच दाबला गेला असता. देवेंद्रजींनी आक्रमकपणे हा विषय लावून धरल्यामुळे वाझेवर कारवाई होऊ शकली.

ते पुढे म्हणाले की, सचिन वाझेला तुम्ही सेवेत सामावून घेतल्यानंतर तो खंडणी वसूल करण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता. तर अनिल देशमुख सभागृहात कशाच्या आधारावर सचिन वाझेचा बचाव करत होते, याचं त्यांनी उत्तर द्यावं. कारण वाझेचं निलंबन तुम्हाला चालणार नव्हतं. आतातर यावर परमबीर सिंह यांनी देखील याबाबत कबुली दिली आहे. त्यामुळे अजून वाझे अजून बोलायचा आहे. एनआयएकडे आता याचा सगळा तपास वर्ग झालाय. त्यामुळे वाझे जर बोलू लागला, तर अनेक गोष्टी बाहेर येतील.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर, ओबीसी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष योगेश टीळेकर, युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे  पुणे शहर भाजपा सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दीपक पोटे, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, महिला शहरअध्यक्ष अर्चना पाटील, युवामोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

From Around the web