शंतनुराव किर्लोस्कर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच रोवली आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ : डॉ. विजय भटकर

 
शंतनुराव किर्लोस्कर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच रोवली आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ : डॉ. विजय भटकर
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे शंतनुराव किर्लोस्कर यांच्या २७ व्या पुण्यतिथीतीनिमित्त पहिला 'आत्मनिर्भर भारत राष्ट्रीय पुरस्कार-२०२१' प्रदान

पुणे : व्यापार व उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे उद्योजक व किर्लोस्कर समूहाचे प्रमुख दिवंगत पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 'आत्मनिर्भर भारत राष्ट्रीय पुरस्कार-२०२१' विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल भारताला पहिला महासंगणक देत आत्मनिर्भर बनवणाऱ्या प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला. बावधन येथील डॉ. भटकर यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, सल्लागार सचिन इटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी व समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. अक्षित कुशल आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. विजय भटकर यांनी भारताला स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणाऱ्या शंतनुराव किर्लोस्करांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. भटकर म्हणाले, "स्वातंत्र्यपूर्व काळात किर्लोस्कर उद्योग समूहाने भारतीय बनावटीची जागतिक दर्जाची उत्पादने बनवली. अनेक देशांत त्याची निर्यातही केली. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्यानंतर शंतनुराव किर्लोस्कर यांच्या दृष्ट्या नेतृत्वामुळे भारताला जगभरात वेगळी ओळख मिळाली. शंतनुराव किर्लोस्कर यांनी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ रोवली."

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "किर्लोस्कर उद्योग समूहाच्या माध्यमातून शंतनुराव किर्लोस्कर यांनी भारताला एक वेगळी ओळख दिली. त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांच्याप्रमाणेच भारताला आत्मनिर्भर बनविण्यात योगदान दिलेल्या व्यक्तींना सन्मानित करून समाजासमोर आदर्श ठेवण्याच्या उद्देशाने दरवर्षी 'आत्मनिर्भर भारत राष्ट्रीय पुरस्कार' दिला जाणार आहे. यंदाचा हा पहिलाच पुरस्कार डॉ. विजय भटकर यांना देताना आनंद होतो आहे. डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या ‘परम’ महासंगणकामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची स्वयंपूर्णता सिद्ध झाली. त्यांचा सन्मान हा आमचा सन्मान आहे."

"कोरोनाचे प्रमाण वाढल्याने ऑक्सिजन व अन्य उपलब्धीची काहीशी टंचाई भासत होती. मात्र, त्यात सुधारणा होत आहे. भारतात सर्वाधिक लसीकरण सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना निसर्गावर मात करण्याऐवजी निसर्गाला सोबत घेऊन प्रगतीच्या दिशेने पावले टाकावी लागतील. भारताकडे आयुर्वेद, योग आहे. त्यामुळे आपण आत्मनिर्भर आहोतच. त्यामध्ये संशोधन होऊन नवीन अविष्कार जगासमोर मांडण्याची आणि नव्याने येणाऱ्या आव्हानांवर मात करण्याची गरज आहे. कोरोनावर मात करण्यासाठी महासंगणकाची मदत घेतली जात आहे. भारतीय पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याची सांगड घालत नवीन औषधे, लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे," असे डॉ. भटकर यांनी सांगितले.

"कोरोना काळात संसाधने उपलब्ध झाली आहेत. सर्वच वैद्यकीय कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत. मात्र, या उपलब्ध झालेल्या संसाधनांचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य असणारे मनुष्यबळ आणखी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची गरज आहे. यासाठी सूर्यदत्ता ग्रूपसारख्या संस्थांनी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण कौशल्य शिकवण्यात पुढाकार घ्यावा," असेही डॉ. भटकर यांनी नमूद केले. प्रा. डॉ. शैलेश कासंडे, सचिन इटकर यांनीही आपले मनोगत मांडले.

पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांच्या नावाने वार्षिक पारितोषिक जाहीर
सूर्यदत्ता संस्थेच्या वतीने पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांच्या नावाने वार्षिक पारितोषिक जाहीर करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत संगणक शास्त्रात बीएस्सी व एमएस्सीच्या अंतिम वर्षात विद्यापीठात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्येकी ५१ हजार रुपये व सुवर्णपदक असे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेत आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीत योगदान देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पारितोषिक प्रोत्साहन ठरेल, असा विश्वास डॉ. भटकर यांनी व्यक्त केला.

From Around the web