'साने गुरुजी नगर मनपा कॉलनीतील घरे मनपासेवकांना मालकी हक्काने द्या' 

  साने गुरुजी नगर बचाव कृती समितीची मागणी 
 
'साने गुरुजी नगर मनपा कॉलनीतील घरे मनपासेवकांना मालकी हक्काने द्या'
  शंभर घरांना आणि बी ओ टी  प्रस्तावाला रहिवाशांच्या सभेत  विरोध

पुणे :पालिका कर्मचाऱ्यांसाठी आंबील ओढ्यानजीक साडे चार एकर जागेत असलेली  साने गुरुजी नगर वसाहत बांधकाम व्यावसायिकाला विकसित करायला देण्याच्या प्रस्तावाला रहिवाशांचा,   साने गुरुजी नगर बचाव कृती समितीचा तीव्र विरोध असून भाडे तत्वावरील चाळीतील ही   घरे मनपा सेवकांना मालकी हक्काने द्या, अशी मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 

कृती समितीने आयोजित केलेल्या रहिवाशांच्या सभेला माजी नगरसेवक धनंजय जाधव , अॅड. गणेश सातपुते, महेश महाले, शाम ढावरे, दिलीप शेडगे ,वामन क्षीरसागर यांनी  मार्गदर्शन केले. महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

   १८ कोटी रुपयांचे वर्गीकरण करून येथे  शंभर घरे बांधण्याच्या  आणि बी ओ टी  तत्त्वावरील प्रस्तावाला रहिवाशांच्या सभेत  विरोध   करण्यात आला आहे .  पुणे महानगर पालिकेच्या साने गुरुजी नगर मनपा कर्मचाऱ्याच्या वसाहत मालकी हक्काच्या संदर्भातील लढा मागील तीस वर्षांपासून चालू आहे. या बाबत मनपा आयुक्तांपासून पालिका   पदाधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या .साडे चार एकर जागेत ११ इमारती  ,६ बैठ्या चाळी असून त्यात ४५० खोल्या आहेत. यातील काही इमारती मोडकळीस आल्या असून सर्व जागेचा जुन्या मालकाशी वाद ही न्यायप्रविष्ठ आहे . पुणे शहराची स्वच्छता करणारे झाडूवाले, सफाई कर्मचारी आणि इतर असे सर्व ९५% हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी या ठिकाणी राहतात . 

        कोरोना साथीच्या आधी साने गुरुजी नगर बचाव कृती समितीच्या वतीने  आंदोलन करण्यात आले होते आणि काही बैठका मनपा मध्ये झाल्या होत्या.  या बैठकीत महापौर , आयुक्त पासून सर्व संबंधित अधिकारी, विविध समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.  बचाव समितीच वतीने माजी  नगरसेवक धनंजय जाधव, ऍड गणेश सातपुते, महेश महाले दिलीप शेडगे, वामनराव क्षीरसागर सहभागी होऊन बी ओ टी का नको म्हणून आणि मनपा कॉलनी मालकी हक्काने, आणि सर्व 17 चाळी सोसायटी करून देणे बाबत  प्रेझेन्टेशन केले. 

        तत्कालीन  महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरव राव यांनी मनपा  अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सहा अधिकाऱ्यांची समिती नेमली. त्यात या समितीने या कॉलनी विकास करतानाबी ओ टी रद्द करण्याचा निर्णय घेतला. आणि तसा अभिप्राय आयुक्तांना दिला. आणि या कॉलनीची बी ओ टी रद्द झाली.

            परंतु 15 डिसेंबर 2020 च्या काही वर्तमान पत्रात  " स्थायी समितीच्या बैठकीत साने गुरुजी नगर कॉलनीत शंभर घरे बांधण्यासाठी 18 कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आल्याची बातमी आली. या प्रस्तावातील एक खोली ४०० चौरस फूट असणार आहे . परंतु "शंभर घरेच का ?" असा प्रश्न सर्व रहिवासी आणि सेवकांना पडला म्हणून महापालिकेचा निषेध करण्यासाठी सर्व स्थानिक रहिवासी यांनी एक सभा घेतली , या सभेस तीनशे ते चारशे रहिवासी उपस्थित होते. 

यावेळी साने गुरुजी नगर बचाव कृती समिती चे विधी सल्लागार अॅड. गणेश सातपुते  म्हणाले ,'गेली तीस वर्षे आम्ही महानगर पालिकेला मागणी करत आहोत की ही जागा येथे राहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावावर करा. परंतु आत्तापर्यंत जो आयुक्त येतो तो मागणी मान्य करतो आणी तेवढ्यात त्यांची बदली होते, मनपा अधिकारी कॉलनी धोकेदायक आहे म्हणतात तर मग नवीन लोकांना येथे खोल्या का देता ?. एकीकडे कॉलनी धोकेदायक झाली म्हणायचे आणि चाळ खात्यातील लोक आर्थिक देवाण घेवाण करून नवीन लोकांना खोल्या देत आहेत. शंभर घरांना आणि बी ओ टी ला आमचा विरोध आहे ' असे म्हणाले

   माजी  नगरसेवक  धनंजय जाधव म्हणाले " माझा जन्मच या कॉलनीत झाला, आमची चौथी पिढी या ठिकाणी राहतीय , माझे आई वडील आम्हाला लहान असल्या पासून सांगायचे की आपल्याला हे घर मालकी तत्वाने मिळणार आहेत, पण आज उद्या म्हणता म्हणता आज माझे वय ४५ झाले पण घर काही मालकीचे  झाले नाही, सर्वाना प्रशासन फसवत आहे. झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना एस आर ए मध्ये त्यांच्या मालकीची घरे मिळतात,  पुण्यात जुन्या वाड्यातील भाडेकऱ्यांना किमान तीनशे फुटाचे घर देण्याचे शासनाने केले आहे , मग आम्ही काय पाप केले आहे ?


जाधव पुढे म्हणाले ,' पुणे मनपा सेवकांना राजेंद्र नगर, कोरेगाव पार्क, अंबिल ओढा कॉलनी, पांडव नगर, वडारवाडी, आर टी ओ जवळ या  ठिकाणी जागेवर सोसायटी करून ९९ वर्षाच्या कराराने जागा दिल्या आहेत, त्याच धर्तीवर आम्हालाही गृह सोसायटीला जागा द्या. शंभर घरे कोणासाठी बांधणार? बिल्डरच्या घशात दोनशे, तीनशे कोटी रुपयाची ही जमीन घालण्यासाठी सगळं चाललं आहे. यात मोठा भ्रष्ट्राचार आहे . सेवकांची दिशाभूल आहे, थोड्याच दिवसात पुणे मनपावर लहान मोठ्या सह सर्व कर्मचारी पुन्हा एकदा आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आमदार खासदार यांना सोसायटीला जागा देने बाबतचा प्रस्ताव देणार आहोत असे ही म्हणाले. 

       
    'स्वतःच्या, कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता पुणे शहर कोरोना मुक्ती साठी आणि स्वच्छते साठी लढणाऱ्या आणि प्राण गमावणाऱ्या चतुर्थ श्रेणी कामगारांना बेघर करण्याचे हे  बक्षीस मनपा प्रशासनाने दिले आहे.  आम्हाला आहे त्या जागेवर आहे तेवढ्या मनपा कर्मचाऱ्यांना मालकीचे घर मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी पुन्हा एकदा हजारो रहिवाश्यांच्या समवेत लवकरच मनपा वर सर्व जण जाण्या साठी नियोजन करा ,'असेही  ते म्हणाले. 

From Around the web