किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्योग दर्जा 

व्यापाऱ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करता येणार
 
sd

पुणे - रिटेल व होलसेल व्यापाऱ्यांना ‘एम एस एम ई’ मध्ये समाविष्ट करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे भाजपा उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी स्वागत केले आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिनजी गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आता सर्व किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

          या निर्णयामुळे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना बँकांच्या वित्त सवलतीसुद्धा उपलब्ध होणार आहेत. प्रामुख्याने आज पर्यंत बँका रिझर्व्ह बँकेच्या प्रायोरिटी लेंडिंग गाईडलाईन्स प्रमाणे फक्त उद्योगांना प्रायोरिटी सेक्टरमध्ये कर्जपुरवठा केला जात होता. आता ते किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना सुद्धा उपलब्ध होईल. भारतात जवळजवळ अडीच कोटीच्या वर व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे, असे श्री.पेशकार यांनी म्हटले आहे. भाजप उद्योग आघाडीची  जबाबदारी सुद्धा या दृष्टीने आता वाढली आहे. अनेक सवलती व अनेक योजना कालांतराने या क्षेत्रासाठी खुल्या होतील अशी अपेक्षा श्री. पेशकार यांनी व्यक्त केली आहे.

          कोरोना  काळात अडचणीत आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना संरक्षित करणाऱ्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीनजी गडकरी यांचे महाराष्ट्र भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. महाराष्ट्रातील सर्व व्यापारी बांधवांनी या मागणीच्या पाठपुराव्यास पाठिंबा दिल्याबद्दल श्री. पेशकार यांनी राज्यातील व्यापाऱ्यांनाही धन्यवाद दिले आहेत.

व्‍यापा-यांचा एमएसएमईमध्‍ये समावेश हा क्रांतिकारक निर्णय - सीए मिलिंद कानडे

  व्‍यापाऱ्यांचा एमएसएमईमध्ये समावेश झाल्‍यामुळे आता, देशातील सर्व व्यापा-यांना कमी व्याजदराने अर्थपुरवठा मिळणे सुलभ होणार असून कमी वाढीव सुरक्षा हमीवर कर्ज मिळणे शक्‍य होईल. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय क्रांतिकारक आहे, अशा शब्दांत भाजपाच्या आर्थिक आघाडीचे महाराष्ट्र राज्य संयोजक सीए मिलिंद कानडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

          एमएसएमई संदर्भात घेण्‍यात आलेल्‍या या निर्णयाचे व्यापक परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे  महागाई कमी होण्‍यास हातभार लागणार असून एमएसएमईला जवळपास 40 कोटी लोकांना रोजगार प्राप्‍त करून देता येईल. सोबतच, वार्षिक 115 लाख कोटींची उलाढाल करता येईल. व्याजदर कमी केल्यामुळे खर्च कमी होईल आणि त्‍यामुळे वस्तूंच्या किंमतीही कमी होतील आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. रोजगार वाढल्‍यामुळे निश्चितपणे व्यवसायातदेखील वृद्धी होईल, असा विश्वास श्री. कानडे यांनी व्यक्त केला आहे.

          पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे भाजपाकडून सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला, असे मिलिंद कानडे म्‍हणाले.   व्याजाचे दर कमी झाल्यामुळे आणि शिथिल करण्‍यात आलेल्‍या अटींमुळे व्यापाऱ्यांना उद्योगांसाठी मुबलक प्रमाणात कच्चा माल कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात मदत होईल.

          व्‍यापाऱ्यांचा एमएसएमईमध्‍ये समावेश करण्‍यात आल्‍यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता व्यापारी एमएसएमई प्रवर्गात येणार असून बँक आणि वित्तीय संस्थांकडून प्राधान्य क्षेत्रातील कर्जाच्या अंतर्गत आवश्यक ते अर्थसहाय्य घेण्यास सक्षम ठरतील. याशिवाय, एमएसएमई प्रवर्गाला मिळणारे शासकीय योजनांचे लाभ व्यापाऱ्यांनादेखील घेता येतील. कोविड या साथीचा रोगामुळे प्रभावित झालेले देशभरातील व्यवसाय / व्यापारी आता बँकेचे सहाय्य घेऊन त्यांचे व्यवसाय प्रभावीपणे पुनर्संचयित करण्यास सक्षम ठरतील, असे त्यांनी म्हटले आहे.

From Around the web