पुण्यात गुंतवणुकदारांची फसवणूक, दोनशे कोटीला लावला चुना

पुणे: गुंतवणुकदारांना १८ ते २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने जवळपास दोनशे कोटी रुपयाला चुना लावला आहे. पंकज छल्लाणी असे या भामट्याचे नाव असून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पंकज छल्लाणी (रा. मुकुंदनगर, पुणे ) याने आतापर्यंत ३५ नागरिकांची २०० कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांना जाळ्यात ओढले. काही दिवस परतावा दिल्यानंतर पैसे देणे सोडून दिले. आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे ३५ जणांचे तक्रार अर्ज आले आहेत.
छल्लाणी हा व्यावसायिक असल्याचे सांगत असून, त्याच्यावर दत्तवाडी पोलिस ठाण्यातही पूर्वी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. भोसलेनगर परिसरातील रिचर्ड अंची (वय ५८, रा. भोसलेनगर ) यांच्या तक्रारीवरून छल्लाणी यांच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.