श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात 'किरणोत्सव सोहळा'

सकाळी ८ वाजून १६ मिनिटांनी सूर्यकिरणांचा गाभा-यात प्रवेश
 
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात 'किरणोत्सव सोहळा'

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या तिस-या दिवशी सकाळी ८ वाजून १६ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.
 
गुरुवारी सकाळी मंदिरात उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभविला. सकाळी ८ वाजून १६ मिनीटे ते ८ वाजून १९ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रीं च्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणे स्नान घालत असल्याचा भास होत होता.
 
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा अनुभवायला मिळतो. गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने ही किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्याने गाभा-यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. त्यामुळे भाविकांना हा सोहळा अनुभवता आला.

From Around the web