जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून ‘संकल्प’ प्रस्तुत मेडिको ‘‘मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’चे आयोजन

पुणे,-कोरोना व्हायरसच्या लढ्यात डॉक्टर ढाल बनून उभे आहेत. घरादाराची, कुटुंबाची, मुलांची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी डॉक्टर आजही लढत आहेत. त्यातही विशेषत: महिला डॉक्टर आपले कुटुंब सांभाळत सामाजिक भानदेखील जपत आहेत. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला डॉक्टरांसाठी ‘मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ आयोजन करण्यात आले आहे. संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रस्तुत ‘मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेडिक्वीनच्या समन्वयक डॉ. प्राजक्ता शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालिका डॉ. अपूर्वा अहिरराव, संसाधन आणि विकास विभाग प्रमुख शर्वरी डोंबे, मेडीक्वीन समन्वयक डॉ. प्राजक्ता शहा, कशिश प्रोडक्शनचे योगेश पवार यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
डॉ. प्रेरणा शहा म्हणाल्या की, मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील महिला डॉक्टर सहभागी होत आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र, त्यातील विविध शाखा जसे स्त्री रोग तज्ञ, नेत्र तज्ञ, फिजीशियन, बालरोगतज्ञ तसेच आयुर्वेद, डेन्टिस्ट, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अशा सर्व शांखांमधल्या डॉक्टरांना सहभागी होण्याचे आवाहन डॉ. प्रेरणा यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन सुरु असून अंतिम फेरी ९, १० आणि ११ एप्रिल २०२१ रोजी पुण्यामध्ये होणार आहे. यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष असल्याची माहिती डॉ. प्रेरणा यांनी यावेळी दिली.
प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी हे स्पर्धेसाठी परिक्षण करणार आहेत. कशिश प्रोडक्शनचे योगेश पवार डॉक्टरांना रॅम्प वॉकसाठी प्रशिक्षण देणार आहेत. धरती फाउंडेशन व डब्लूएसडब्लू या संस्थादेखील यामध्ये सहभागी झाल्या आहेत.
डॉ. अपूर्वा अहिरराव म्हणाल्या की, महिला डॉक्टरांचे सामाजिक कार्य, आत्मविश्वास, तंदुरुस्ती, आरोग्याच्या जागृतीसाठी तसेच त्यांच्यातील स्व:चा शोध घेण्यासाठी हि विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाकाळात प्रत्येक जीव वाचवण्यासाठी त्यांची खटपट, अपार प्रयत्न, दिवसरात्र मेहनत आणि समाजासाठी त्यांनी दिलेलं योगदान, यांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धा घेत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून महिला डॉक्टरांना स्वत:ला पुरेसा वेळ देता येईल, त्याचबरोबर पुन्हा नव्या जोमाने व आत्मविश्वासाने दैनंदिन कामांना सुरुवात करता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.mediqueens.in किंवा 9689908818 या क्रमांकावर संपर्क साधावा.