पुण्यात शनिवारपासून मिनी लॉकडाऊन

पुणे - पुण्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने उद्यापासून ( शनिवार ) मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली लॉकडाऊन संदर्भात बैठक पार पडल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांना माहिती दिली.
पुण्यात 12 तासांच्या नाईट कर्फ्यूची घोषणा
पुण्यात वाढत्या करोना प्रादुर्भाव पाहता 12 तासांच्या नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. हा निर्णय शनिवार 3 एप्रिलपासून अंमलात येणार असून शुक्रवारी या संदर्भात आढावा घेण्यात येईल.
या निर्णयाची माहिती देताना सौरभ राव यांनी सांगितलं की, पुढील 7 दिवस हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार बंद राहाणार. याशिवाय विवाह आणि अंत्यसंस्कार वगळता कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभास 50 लोकांना आणि अंत्यसंस्कारात 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
याबाबत सौरभ राव म्हणाले, 'परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील'.
बेडची संख्या वाढवणार,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.
'कोरोना' प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
पुण्यात काय सुरु ,काय बंद?
- सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.
- मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद
- धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद
- PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
- आठवडे बाजारही बंद
- लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत
- संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल.
- केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
- होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार
- अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गोष्टी बंद
- दिवसा जमाव बंदी, रात्री संचार बंदी
- उद्याने सकाळी सुरू रहाणार
- उद्यापासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणारं…
- शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार मात्र परीक्षा वेळेत होणार