राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात  'महागाईविरोधी जनआक्रोश आंदोलन'

महागाईविरोधात जनताच रस्त्यावर उतरेल:पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा 
 
s

पुणे : सातत्याने सुरू असलेल्या महागाईवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. नोटबंदी या केंद्र सरकारने लादलेल्या कृत्रिम आपत्तीमुळे आणि सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यातच भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटकाही सामान्यांना बसत आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारने योग्य धोरणे आखून सामान्यांना दिलासा दिला नाही, तर राजकीय पक्षच नव्हे, तर सामान्य जनताही रस्त्यावर उतरून भाजप नेत्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.सत्तेवर येताच भाजप नेत्यांच्या संवेदना मेल्या असून, जनतेची दुर्दशा पाहण्यातच नेते समाधान मानत आहेत. सामान्य जनता रस्त्यावर उतरल्यास भाजप नेत्यांना रस्त्यांवर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा शनिवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला. 

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या महागाईवाढीच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर 'महागाईविरोधी जनआक्रोश आंदोलन' करण्यात आले. या वेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला.  

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची भाषणे झाली. आंदोलनास महेश हांडे, महेंद्र पठारे, प्रदीप देशमुख, मृणालिनी वाणी, नीलेश निकम, बाळासाहेब बोडके, सर्व विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ,कार्यकर्ते आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. 

गेल्या काही महिन्यांपासून महागाई सातत्याने वाढत आहे. अत्यावश्यक गरज असलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत सहा महिन्यांत तब्बल १४० रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल प्रति लीटर १०५ रुपयांवर जाऊन पोचले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. एकीकडे नोटबंदीमुळे अनेकांना रोजगार गमवावे लागले आहे. त्यातच कोरोनासारख्या साथरोगाची भर पडली आहे. सामान्य जनतेला जीवन जगण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनतेला दिलासा देणारे धोरण स्वीकारणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. 

परंतु, सामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नसणाऱ्या आणि केवळ धनदांडग्यांचे हितसंबंध जोपासणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून सामान्यांना आणखी अडचणीच्या खाईत  लोटण्याचे धोरण स्वीकारले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याचा निषेध करण्यात येत आहे. केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिला नाही, तर जनता रस्त्यावर उतरेल. अशा परिस्थितीत भाजप नेत्यांना रस्त्यांवर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला.

From Around the web