कोणतीही स्त्री ही अबला असू शकत नाही ... 

- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आरती दातार यांचे मत 
 
कोणतीही स्त्री ही अबला असू शकत नाही ...
नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे सन्मान स्त्री शक्तीचा सोहळ्याचे आयोजन 

पुणे : कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत. कुटुंब सांभाळून सर्व कामे करताना त्यांची तारेवरची कसरत होते. ज्याप्रमाणे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. तसेच या विविध क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांमागे पुरुष देखील आहेत, हे आताचे प्रेरणादायी चित्र आहे. दुर्गा, शक्ती, अंबा ही स्त्री ची विविध रुपे आहेत. त्यामुळे कोणतीही स्त्री अबला असू शकत नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.आरती दातार यांनी व्यक्त केले.
 
नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणात सन्मान स्त्री शक्तीचा या सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार मुक्ता टिळक, कार्यक्रमाचे आयोजक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मृणाली रासने, नगरसेवक राजेश येनपुरे, अ‍ॅड.गायत्री खडके, अजय खेडेकर, मनिषा लडकत आदी उपस्थित होते. 

नृत्यांगना गुरु डॉ.सुचेता भिडे-चापेकर, क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री शितल महाजन, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भांडवलकर, आरोग्य क्षेत्रातील छाया जगताप यांना यावर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपरणे, सन्मानचिन्ह, पैठणी साडी असे सन्मानाचे स्वरूप होते. 

मुक्ता टिळक म्हणाल्या, शिक्षण आणि आरोग्य हा महिलांचा केंद्रबिंदू ठरला पाहिजे. प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाचा कणा आहे. तो कणा मोडता कामा नये, याकडे महिलांनी लक्ष द्यायला हवे. त्याचा परिणाम पुढील पिढीवर होतो. त्यामुळे शिक्षण व आरोग्य याकडे महिलांनी लक्ष द्यावे. 

डॉ.सुचेता भिडे चापेकर म्हणाल्या, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे संस्कारक्षम शिक्षण व कला ही देखील प्राथमिक गरज आहे. कलेच्या जाणीवेतून माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो. कला माणसातील मनुष्यत्व जागृत ठेवते. त्यामुळे कला ही माणसाला सर्व काही मिळवून देते, असेही त्यांनी सांगितले. शितल महाजन म्हणाल्या, भारतामध्ये पॅराशूट जंपिंग हा आकाशातील खेळ म्हणून ओळखला जातो. सन २०१२ पासून मी भारताचे या क्रीडा प्रकारामध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. हे करीत असताना मी पुण्याची असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. 

वैशाली भांडवलकर म्हणाल्या, कोणाचीही प्रतिकूल परिस्थिती बदलण्यास शिक्षण हेच उत्तम माध्यम आहे. त्यामुळे मुलींना शिक्षणापासून दूर ठेऊ नका. मुलींना जर शिक्षणाच्या योग्य संधी मिळाल्या, तर नक्कीच त्या संधीचे मुली सोने करतील. 

हेमंत रासने म्हणाले, देशाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीने राहिले आहे. त्यामुळे समाजाच्या विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून उत्तुंग भरारी घेणा-या महिलांचे कार्य समाजासमोर यावे, याउद््देशाने सन्मान स्त्री शक्तीचा या सोहळा आयोजित केला जातो. आपले कुटुंब उभे रहावे, यासाठी प्रत्येक स्त्री झटत असते. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला कौतुकाची थाप देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. 

रुबल अग्रवाल, छाया जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमानंतर महिलांसाठी हळदी-कुंकू व तिळगूळ समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

From Around the web