Pune News | अभिनंदन ! CS परीक्षेत पुण्याची वैष्णवी बियाणी देशात प्रथम

पुणे - इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) घेण्यात आलेल्या सीएस अभ्यासक्रमाच्या प्रोफेशनल प्रोग्राम आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॉम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रोफेशनल प्रोग्रामच्या नवीन अभ्यासक्रमात पुण्यातील वैष्णवी बियाणी आणि जुन्या अभ्यासक्रमात नागपूरचा इशान लोईया याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
"आयसीएसआय'कडून नुकताच प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामची परीक्षा जून 2019 मध्ये घेण्यात आली. नवीन अभ्यासक्रम आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार निकाल जाहीर केला. सीएसच्या फाउंडेशन प्रोग्राम परीक्षेत 66.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात दिल्ली येथील श्रृती अग्रवाल देशात पहिली आली आहे.
जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रोफेशनल्स प्रोग्राम परीक्षेचा ग्रुप एकचा निकाल 33.22 टक्के, ग्रुप दोनचा निकाल 30.65 टक्के आणि ग्रुप तीनचा निकाल 29.23 टक्के इतका लागला आहे. तर, नवीन अभ्यासक्रमानुसार प्रोफेशनल प्रोग्राम परीक्षेचा गटनुसार अनुक्रमे 24.14 टक्के, 16.86 टक्के आणि 29.80 टक्के लागला आहे.
जुन्या अभ्यासक्रमानुसार एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम गट एकचा निकाल 24.31 टक्के, ग्रुप दोनचा निकाल 17.33 टक्के लागला आहे. तर नवीन अभ्यासक्रमानुसार एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम परीक्षेचा गट एकचा 16.60 टक्के आणि गट दोनचा निकाल 23.66 टक्के लागला आहे. सीएसच्या प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामची पुढील 21 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
कौतुकास्पद यश...
सीएसच्या प्रोफेशनल प्रोग्रामच्या नवीन अभ्यासक्रमात पुण्यातील सुखसागरनगर येथील वैष्णवी बद्रीनारायण बियाणी ही देशात प्रथम आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत आणि आर्थिक हलाखीची असतानाही वैष्णवीने हे यश संपादन केले आहे. आई-वडील स्टेशनरीचे दुकान चालवतात. सुखसागरनगरमधील हिरामण बनकर शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर, नूतन मराठी विद्यालयातून (नूमवी) कॉमर्स शाखेतून अकरावी बारावीचे शिक्षण घेतले.