ऋषिपंचमीला निनादले 'ओम नमस्ते गणपतये' चे स्वर ... 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन
 
ganpti
मंदिरात प्रातिनिधिक ५ महिलांची उपस्थिती तर ऑनलाईन माध्यमांद्वारे हजारो भाविकांचा सहभाग   

पुणे :  'ओम नमस्ते गणपतये...'चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर निनादले. दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा, यंदा सलग दुसऱ्या वर्षी  दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या ५ महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी, ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यंदाही मुख्य मंदिरात प्रत्यक्षपणे पाच महिलांचीच उपस्थिती होती. शुभांगी भालेराव यांसह अर्चना भालेराव, जयश्री शेळके, प्रेरणा देशपांडे, ज्योती देशमुख, स्नेहा परांजपे या ५ महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १२ वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचं ३५ वे वर्ष आहे. 

g

अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी ६ वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गणेश वंदना, दाही दिशांनी तम लोपवा प्रथमेशा जग जागवा... हे गीत सादर झाले. त्यानंतर गजर व आरती झाली. मंदिरात उपस्थित महिलांसह ऑनलाईन पध्दतीने उपस्थित भाविकांनी  श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष पठण केले. 

उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरा बाहेरुन दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्वीकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये आणि ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आलं आहे.

From Around the web